'अमेरिकेकडून तेल खरेदी भारताच्या हिताचे', रशियन तेल आयातीबाबत पीयूष गोयल यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 21:16 IST2026-02-08T21:14:56+5:302026-02-08T21:16:12+5:30
Piyush Goyal on Russian Oil Import: अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे रशियन तेलाची आयात बंद होणार?

'अमेरिकेकडून तेल खरेदी भारताच्या हिताचे', रशियन तेल आयातीबाबत पीयूष गोयल यांची स्पष्टोक्ती
Piyush Goyal on Russian Oil Import: भारताने अमेरिकेसोबत व्यापार करार केला आहे, मात्र रशियन तेल आयातीबाबत अजूनही स्पष्टता मिळाली नाही. दरम्यान, भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी(८ फेब्रुवारी २०२६) अमेरिकेसोबत होणाऱ्या ट्रेड डीलबाबत भाष्य करताना रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर थेट उत्तर देणे टाळले. मात्र, त्यांनी अमेरिकेडून तेल खरेदी करणे भारताच्या हिताचे असल्याचे म्हटले.
ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणणे भारताच्या हिताचे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास २५ टक्के टॅरिफ पुन्हा लावण्याची अट घातल्याच्या पार्श्वभूमीवर गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले, अमेरिकेकडून कच्चे तेल, LNG किंवा LPG खरेदी करणे भारताच्या रणनीतिक हितांमध्ये आहे, कारण आम्ही आमच्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणत आहोत.
#WATCH | India-US Trade Deal | Speaking to ANI, Union Commerce Minister Piyush Goyal says, "...The buying of crude oil or LNG, LPG from the US is in India's own strategic interests as we diversify our oil sources. But the decisions are taken by the buyers, by the companies… pic.twitter.com/2kA3P2nvWq
— ANI (@ANI) February 8, 2026
ट्रेड डीलवर रशियन तेलाचा परिणाम होणार नाही
न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोयल यांना विचारण्यात आले की, रशियन तेल किंवा संरक्षण क्षेत्रातील मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती न झाल्यास ट्रेड डीलवर त्याचा परिणाम होईल का? यावर त्यांनी ठामपणे उत्तर दिले, नाही, अजिबात नाही. ट्रेड डीलमध्ये कोण कोणाकडून काय खरेदी करेल, हे ठरवले जात नाही. ट्रेड डीलचा उद्देश व्यापार सुलभ करणे आणि प्राधान्याच्या आधारे बाजारात प्रवेश मिळवून देणे हा असतो.
FTA मुळे भारताला स्पर्धात्मक फायदा
केंद्रीय मंत्र्यांच्या मते, अमेरिका हा काम करण्यासाठी एक उत्तम देश आहे. खरं तर, अमेरिका हा व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम देश आहे. मी स्वतः, माझ्या तरुणपणी, अमेरिकेत अनेक उत्पादने निर्यात केली आहेत. फ्री ट्रेड अॅग्रीमेंट (FTA) चा मुख्य उद्देश म्हणजे प्राधान्य प्रवेश देणे. जेव्हा आम्हाला १८ टक्के रेसिप्रोकल टॅरिफ मिळतो, तेव्हा इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारताला आघाडी मिळते. हे देश बहुतांश वेळा आपले थेट स्पर्धक असतात, असेही गोयल यांनी नमूद केले.
#WATCH | India-US Trade Deal | Speaking to ANI, on allegations of ceding India's sovereignty, Union Commerce Minister Piyush Goyal says, "Absolute nonsense. Whoever is articulating this must be a pretty ignorant person who doesn't understand that this trade deal is truly a labour… pic.twitter.com/bK0pXmJZJf
— ANI (@ANI) February 8, 2026
भारतासाठी अनेक संधी निर्माण होणार...
भारताचे सार्वभौमत्व गहाण ठेवल्याच्या आरोपांवर बोलताना पीयूष गोयल म्हणाले, हा निव्वळ मूर्खपणा आहे. जो कोणी हे बोलत आहे, तो खूप अज्ञानी व्यक्ती असला पाहिजे, ज्याला हे समजत नाही की, हा करार दोन्ही बाजूंनी झालेल्या गहन वाटाघाटींमधून साकारला आहे, जो आपल्या देशाच्या २०४७ पर्यंत विकसित आणि समृद्ध देश बनण्याच्या उद्दिष्टाच्या सर्वोत्तम हिताचे आहे.