पाकिस्तानी नागरिकानं 18 वेळा केला भारताचा दौरा, गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 23:31 IST2025-02-20T23:30:39+5:302025-02-20T23:31:36+5:30
Himanta Biswa Sarma : या प्रकरणातील प्राथमिक माहिती काँग्रेससाठी 'अत्यंत घातक' आहे आणि याचा आसामच्या राजकारणावर 'मोठा परिणाम' होणार आहे, असा दावाही सरमा यांनी यावेळी केला आहे.

पाकिस्तानी नागरिकानं 18 वेळा केला भारताचा दौरा, गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी गुरुवारी विधानसभेत एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले, आसामपोलिसांनी देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली दाखल केलेल्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेखने २०१० ते २०१८ दरम्यान १८ वेळा भारताचा दौरा केला. एवढेच नाही तर, या प्रकरणातील प्राथमिक माहिती काँग्रेससाठी 'अत्यंत घातक' आहे आणि याचा आसामच्या राजकारणावर 'मोठा परिणाम' होणार आहे, असा दावाही सरमा यांनी यावेळी केला आहे. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील विधानसभेत चर्चेदरम्यान बोलत होते.
SIT कडे तपास, ऑगस्टपर्यंत मोठ्या खुलाशाच्या दावा -
आसाम पोलिसांनी सोमवारी अली तौकीर शेख आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले, "एसआयटी स्थापन झाल्यानंतर केवळ दोनच दिवसांत, शेखने नोव्हेंबर २०१० ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान १८ वेळा भारत दौरा केला, अशी माहिती आम्हाला मिळाली. लवकरच हे देखील स्पष्ट होईल की त्याला भारतात कोणी आमंत्रित केले होते? त्या कोठे थांबवण्यात आले होते? आणि या दौऱ्यांत त्याने काय केले?"
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, "हे प्रकरण ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आसामचे राजकारण प्रचंड प्रभावित करेल. तौकीर स्वतःला हवामान कार्यकर्ता म्हणवतो, मात्र त्याला आसाम आणि भारताच्या अंतर्गत राजकारणात अधिक रस होता, असे वाटते."
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन असल्याचा आरोप -
रविवारी, आसाम मंत्रिमंडळाने पोलिसांना अली तौकीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई यांच्याशी त्यांचे काही संबंध होते का आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला काही धोका निर्माण होऊ शकतो का? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एलिझाबेथ या ब्रिटिश नागरिक आहे.
मुख्यमंत्री सर्मा यांनी असाही दावा केला आहे की, एलिझाबेथ गोगोई या इस्लामाबादमधील त्यांच्या कार्यकाळात शेख यांनी स्थापन केलेल्या लीड पाकिस्तान नावाच्या एका ना-नफा संस्थेचा भाग होत्या. ते दोघेही भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये काम करणाऱ्या क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क (सीडीकेएन) नावाच्या जागतिक हवामान समूहाचे सदस्यही होते." दरम्यान, गौरव गोगोई यांनी, हे आरोप "निराधार आणि बदनामीचे षड्यंत्र" असल्याचे म्हटले आहे.