आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ; ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:00 IST2026-04-26T04:59:57+5:302026-04-26T05:00:22+5:30
विधानसभेसाठी रणनीती! चड्ढांची भूमिका ठरेल निर्णायक, भगवंत मान सरकारला धोका

आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ; ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
नवी दिल्ली - राघव चड्ढा यांच्यासह सात राज्यसभा खासदारांनी एकाचवेळी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजप पंजाबमध्ये मोठा ‘खेळ’ करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन लोटस’च्या दुसऱ्या टप्प्यात या खासदारांच्या जवळच्या ३५ ते ४० आमदारांना आपल्या गोटात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळत असले तरी त्यांनी या घडामोडींबाबत स्पष्ट शब्दांत इन्कारही केलेला नाही.
पंजाबमध्ये २०२७ साली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने ही घडामोड पंजाबमधील ‘आप’साठी सर्वांत मोठे संकट मानले जात आहे. यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे पंजाबमध्ये पक्षाच्या रणनीती व संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत होते. पण, आता त्या गोष्टींचा फायदा भाजपला होणार आहे.
मान राष्ट्रपतींना भेटणार
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्षाच्या आमदारांसह राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. या भेटीत ते बंडखोर खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडणार आहेत. आप नेते संजय सिंह यांनी सांगितले की, त्या सात खासदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी राज्यसभा सभापतींना पत्र लिहून करणार आहे.
चड्ढांचे फॉलोअर्स १४ लाखांनी घटले
‘आप’चा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स सुमारे १४ लाखांनी घटले आहेत. शुक्रवारी त्यांचे १.४६ कोटी फॉलोअर होते, तर शनिवारी संध्याकाळपर्यंत ही संख्या १.३२ कोटीपर्यंत खाली घसरली. तरुण युजर्सनी एकप्रकारे ही नाराजी दर्शविली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चड्ढा हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे युवा समर्थकांना रुचले नसल्याची चर्चा आहे.
‘आप’मध्ये आणखी फूट पडणार?
२०२२मध्ये पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयामागे संदीप पाठक आणि राघव चड्ढा यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याचा ‘आप’ची संघटना आणि निवडणुकीच्या व्यवस्थापनावर परिणाम होणे निश्चित मानले जात आहे. ही फूट म्हणजे पक्षातील वाढत्या असंतोषाचा परिणाम आहे, असे मत राजकीय निरीक्षकांचे आहे. ‘आप’चे खासदार आपल्या गोटात आणून भाजपने पंजाबमध्ये २०२७च्या विधानसभा निवडणुकांसाठी ‘एकला चलो’ धोरणावर काम सुरू केले आहे.
केजरीवालांनी ‘शीशमहल-२’ सज्ज केल्याचा भाजपचा आरोप; आपचा इन्कार
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील लोधी इस्टेट येथे मिळालेल्या नव्या बंगल्याच्या मुद्द्यावरून भाजपने त्यांना लक्ष्य केले. हा बंगला म्हणजे ‘शीशमहल-२’ असून, त्यात अनेक सुविधांसाठी खासगी निधीचा मोठा वापर केल्याचा आरोप दिल्लीचे सार्वजनिक बांधकाममंत्री प्रवेशसाहिब सिंग वर्मा यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. हा आरोप व त्याच्या पुष्ट्यर्थ भाजपने प्रसिद्ध केलेले फोटो खोटे असल्याचा दावा आप नेत्या आतिशी यांनी केला.