ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 06:34 IST2026-04-26T06:33:27+5:302026-04-26T06:34:09+5:30

नेस्को प्रकरणासारख्या घटना ही केवळ अपवाद नसून मोठ्या संकटाची लक्षणे आहेत. मुख्य म्हणजे मुंबई, पुणे या शहरांच्या उपनगरात कडक कारवाई अपेक्षित आहे. परदेशी व स्थानिक समाजकंटकांनी तिथल्या शांततेचा गैरफायदा घेऊन नवी केंद्रे चालवली आहेत. मानवी आणि तांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

Article on Goregoan Nesco Drugs Case, Drug supply is part of the secret war against India | ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग

ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग

प्रवीण दीक्षित
निवृत्त पोलिस महासंचालक

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को परिसरात झालेल्या कार्यक्रमात अमलीपदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक ठरली. तरुण पिढीत अमलीपदार्थांचे वाढते आकर्षण ही केवळ वैयक्तिक समस्या राहिली नसून व्यापक सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर नार्को टेररिझमचा मुद्दा अधिक गंभीर ठरतो. अमली पदार्थांच्या उत्पादन, तस्करी आणि विक्रीतून निर्माण होणारा प्रचंड पैसा दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करतो. त्यामुळे ड्रग्जचा प्रश्न हा केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित राहात नाही, तर तो देशाच्या सुरक्षेशी थेट संबंधित ठरतो. विशेषतः अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि म्यानमारसारख्या देशांतून होणारा अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग असल्याचे दिसून येते.

दुसरी गंभीर बाजू म्हणजे वाढती व्यसनाधीनता. युवकांमध्ये ‘चटक’ म्हणून सुरू होणारे सेवन हळूहळू व्यसनात परिवर्तित होते. कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पगार, सहज उपलब्ध पैसा आणि बदललेली जीवनशैली यामुळे काही तरुण या मार्गाकडे वळताना दिसतात. या पार्श्वभूमीवर केवळ पोलिस कारवाई पुरेशी ठरत नाही. जरी कठोर कारवाया, छापे आणि प्रतिबंधक विभाग कार्यरत असले तरी ड्रग्ज पूर्णपणे थांबवणे कठीण आहे. कारण मागणी असेपर्यंत पुरवठा थांबत नाही. त्यामुळे युवकांनी स्वतःहून अमलीपदार्थांना नकार देणे हेच सर्वात प्रभावी उपाय आहे. तसेच, शासन आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. नार्को टेररिझम हा समाज, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारा व्यापक प्रश्न आहे. यावर मात करण्यासाठी समाज, पालक, युवक व शासन यांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.

कुठे आहे ड्रग्जचा उगम?
जागतिक स्तरावर ‘गोल्डन क्रेसेंट’ आणि ‘गोल्डन ट्रँगल’ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमलीपदार्थांचे उत्पादन होते. गरिबी, राजकीय अस्थिरता आणि कमी खर्चात होणारी लागवड यामुळे या भागांमध्ये हा व्यवसाय फोफावला आहे. या अमलीपदार्थांची तस्करी विविध मार्गांनी भारतात केली जाते - ड्रोन, बोटी, रस्ते, रेल्वेमार्ग आणि अगदी मानवी साखळ्यांद्वारेही. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये ड्रग्ज सहज उपलब्ध होत आहेत.

भारतातही होतेय उत्पादन...
भारत पूर्वी ‘ट्रान्झिट हब’ म्हणून ओळखला जात असला, तरी आता देशातच अमलीपदार्थांचे उत्पादन वाढू लागले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांतील सुपीक जमीन या लागवडीस पोषक ठरत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी होत असून, पुण्यासारख्या शहरात हजारो कोटींचा साठा जप्त झाल्याची घटना याचे उदाहरण आहे. 

Web Title: Article on Goregoan Nesco Drugs Case, Drug supply is part of the secret war against India