दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:56 IST2026-04-26T05:54:06+5:302026-04-26T05:56:08+5:30
वंचितचा दावा : फडणवीसांचा इन्कार पण राऊत म्हणाले, ‘तेच’ सांगतील

दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई - उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते आणि त्यांंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, असा दावा केला गेल्याने शनिवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या हँडलवर या भेटीचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर चर्चेला उधाण आले. विधान परिषदेच्या १० जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील की नाही, याबाबत उत्सुकता आहे. ठाकरे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)ने आधीच पाठिंबा दिला आहे. ठाकरे उमेदवार असले तर एकूणच निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना फडणवीस-ठाकरे यांच्यातील कथित भेटीचे वृत्त आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘ऑपरेशन टायगर’द्वारे उद्धवसेनेचे खासदार गळाला लावणार असल्याच्या बातम्यामुळे चर्चेला उधान आले आहे.
भेट झाली नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, उद्धव ठाकरे यांना मला भेटायचे असेल वा आमची भेट व्हायची असेल तर ती लपूनछपून करण्याची गरज नाही. लपवून भेटण्यासारखा कोणता विषयदेखील नाही. अशी कोणतीही भेट झालेली नाही. जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा खोटारड्या हँडलना नोटीस बजावली जाईल.
तेव्हा होती भाजपची बैठक
बुधवारी रात्री भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे फडणवीस - ठाकरे भेटीचे वृत्त निखालस खोटे असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला.
संजय राऊत यांनी सस्पेन्स वाढवला
फडणवीस यांनी जसा स्पष्ट शब्दांत या भेटीचा इन्कार केला तसा इन्कार उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केला नाही. ते म्हणाले की, त्या दोघांचे फोनवर बोलणे झाले वा प्रत्यक्ष भेट झाली का? याबाबत ते दोघेच सांगू शकतात. मला त्याबाबत काही माहिती असेल तर मी का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, त्यावर आतापासूनच पाणी का फिरवायचे? असे म्हणत राऊत यांनी सस्पेन्स वाढवला.
सगळे संपर्कात - संजय शिरसाट
‘ऑपरेशन टायगर’ सांगून होणार नाही, पण सगळे आमच्या संपर्कात आहेत, असे सामाजिक न्यायमंत्री व शिंदेसेनेचे नेते शिरसाट यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले की, ‘ऑपरेशन टायगर’ होणार हे आम्ही नाकारत नाही. पण त्याबाबत योग्य निर्णय कधी घ्यायचा ते शिंदेच ठरवतील.