संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
By अतुल कुलकर्णी | Updated: April 26, 2026 06:28 IST2026-04-26T06:27:47+5:302026-04-26T06:28:58+5:30
संजय गायकवाड यांच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचवण्यामागे काही परकीय शक्तींचा हात होता का? एखादे पुस्तक ३८ वर्षानंतर अशा पद्धतीने चर्चेत आणले त्यामागे त्या पुस्तकाचा खप वाढावा अशी तर कुणाची चाल नसेल..?

संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
श्री. एकनाथ शिंदेजी
जय महाराष्ट्र
आमदार संजय गायकवाड आपल्या पक्षाची कीर्ती सर्वदूर जावी यासाठी जी विधाने करत आहेत त्यासाठी त्यांचा सत्कार करायला हवा. त्या सत्काराची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे... १९८८ मध्ये गोविंद पानसरे यांनी लिहिलेले पुस्तक गायकवाड यांच्या हाती पडले आणि त्यांनी त्या प्रकाशकाला जे काही सुनावले त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आम्ही तर शिवाजी पार्कवर (माफ करा, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर असे आता म्हणायचे का?) त्यांच्या जाहीर सत्काराची तयारी सुरू केली होती. मात्र त्यांनी मध्येच केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली. त्यामुळे सत्कार ठेवावा की नाही, हा प्रश्न पडला आहे.
साहेब, हे असे भारी भारी आमदार आपल्याला कुठे सापडतात..? त्यासाठी आपण काही विशेष शोधमोहीम राबवली होती का..? हे असे आमदार आपली प्रतिमा उंचावत आहेत की बिघडवत आहेत? यावर पक्षात कोणी चिंता किंवा चर्चा करते का..? असे काही बाळबोध प्रश्न आमच्या मनाला पडले आहेत. आमदार गायकवाड यांनी प्रकाशकाला, तुला पण गोविंद पानसरे यांच्याकडे पाठवू का? असे काहीतरी सांगितले... याचा आधार घेऊन भाजपचे काही नेते यामागे नेमका कोणाचा हात असेल याचा शोध घ्या...असे पत्र पोलिस महासंचालकांना पाठवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आपल्याला माहिती असावी म्हणून कळवले.
साहेब, यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे आमदार साहेबांना द्यायला सांगता का? म्हणजे विनाकारण तुमच्या डोक्याला ताप होणार नाही. प्रश्न तसे खूप आहेत पण जागेअभावी सगळे प्रश्न लिहिता येणार नाहीत. तरीही काही मोजके प्रश्न असे आहेत...पानसरे यांचे पुस्तक वाचण्याची सक्ती करायची की आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी ते पुस्तक वाचले त्या सगळ्यांना शिक्षा करायची..? शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करायचा नाही तर मग ज्या शाळेत संजय गायकवाड शिकले त्या शाळेचे नाव ‘शिवाजी विद्यालय’ आहे त्याचे काय करायचे..? नीलमताई गोऱ्हे म्हणाल्याप्रमाणे, शाळेच्या नावामागची भूमिका योग्य आहे. पण नाव देण्याचा मार्ग चुकला..! असे सांगायचे का? संजय गायकवाड यांच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचवण्यामागे काही परकीय शक्तींचा हात होता का? एखादे पुस्तक ३८ वर्षानंतर अशा पद्धतीने चर्चेत आणले त्यामागे त्या पुस्तकाचा खप वाढावा अशी तर कुणाची चाल नसेल..? छत्रपती शिवाजी महाराज लोककल्याणकारी होते. त्यांचे वर्णन करताना रामदास स्वामींनी
निश्चयाचा महामेरू l बहुत जनांसी आधारू l
अखंड स्थितीचा निर्धारू l श्रीमंत योगी ll१ll
परोपकाराचिया राशी l उदंड घडती जयासी l
तयाचे गुणमहत्त्वासी l तुळणा कैची ll२ll
आचारशील विचारशील l दानशील धर्मशील l
सर्वज्ञपणे सुशील l सकाळ ठायीं ll३ll
असे लिहिले होते. छत्रपती शिवाजी महाराज, यशवंत... कीर्तिवंत... सामर्थ्यवंत... वरदवंत... पुण्यवंत... नीतीवंत... असे जाणता राजा होते. यातले कोणते गुण आपल्या आमदार महोदयांनी घेतले, याचा शोध घेण्यासाठी एखादी समिती स्थापन करणार का? याच महोदयांनी आमदार निवासातल्या वेटरला बदडून काढले होते. त्यावेळी त्यांच्यात नेमके कोणते आचारशील, विचारशील वर्तन संचारले होते? आत्तापर्यंत गायकवाड यांनी जी विधाने केली ती कोणाची प्रेरणा घेऊन केली? पानसरे यांचे पुस्तक त्यांनी न वाचताच वेगवेगळ्या शिव्यांचा शब्दसंग्रह त्या प्रकाशकाला मध्यरात्री एक वाजता बहाल केला त्याची एखादी छोटी पुस्तिका काढायची का? म्हणजे भविष्यात आपल्या पक्षात येणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना कोणाशी कसे बोलावे याचा वस्तुपाठ मिळेल, असे आपल्याला वाटते का?
नववी पास नेते इतक्या उच्च दर्जाच्या शिव्यांचे धनी असतात हे तुम्हाला माहिती होते का? अशा कर्तृत्वसंपन्न आमदारांना अभिजात मराठीची सेवा करण्यासाठी एखादी समिती स्थापन करून देणार का..? असो. आपला जास्त वेळ घेत नाही प्रत्यक्ष भेटीत बोलूच. मात्र या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी देण्यासाठी विद्यमान खासदार मिलिंद देवरा आणि माजी खासदार संजय निरुपम यांची कमिटी नेमता येईल का याचाही विचार करा...
- तुमचाच बाबूराव