Novavax Vaccine : कोरोनाविरोधात 'नोव्हाव्हॅक्स' 90.4 टक्के प्रभावी; SII सोबत लवकरच काम सुरु करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:24 PM2021-06-15T12:24:19+5:302021-06-15T12:25:34+5:30

Novavax Vaccine : नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एका वर्षात कोरोना लसीचे 200 कोटी डोस (एका महिन्यात 5 कोटी) तयार करण्याचा करार केला आहे.

Novavax Vaccine: 90 percent efficacy novavax centre looking to fast track rollout | Novavax Vaccine : कोरोनाविरोधात 'नोव्हाव्हॅक्स' 90.4 टक्के प्रभावी; SII सोबत लवकरच काम सुरु करणार 

Novavax Vaccine : कोरोनाविरोधात 'नोव्हाव्हॅक्स' 90.4 टक्के प्रभावी; SII सोबत लवकरच काम सुरु करणार 

Next

नवी दिल्ली/ वॉशिंग्टन : अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्सने (Novavax) तयार केलेल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निकाल लागला आहे. ही लस कोरोना व्हायरसविरुद्धच्या (Coronavirus) सौम्य, मध्यम आणि गंभीर आजारावर 90.4% प्रभावी असल्याचे आढळले आहे. अशा परिस्थितीत आता नोव्हाव्हॅक्सच्या अंतरिम डेटाच्या आधारे भारत सरकार लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) याचे मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर म्हणून लवकरच काम करण्यास सांगण्याची शक्यता आहे.

नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एका वर्षात कोरोना लसीचे 200 कोटी डोस (एका महिन्यात 5 कोटी) तयार करण्याचा करार केला आहे. ऑगस्टमध्ये हा करार झाला होता. डोस सप्टेंबर-डिसेंबर पर्यंत प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. गरजेनुसार डोसची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नोव्हाव्हॅक्स कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून संरक्षण करण्यासाठी  देखील प्रभावी ठरली आहे. चांगल्या निकालांमुळे लवकरच या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता मिळण्याची आशा वाढली आहे. जगभरातील लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हे निकाल जाहीर केले आहेत. करारानुसार किमान आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी आणि भारतासाठी किमान 100 दशलक्ष डोस तयार केले जातील.

नोव्हाव्हॅक्सच्या या लसीचे नाव भारतात 'कोवाव्हॅक्स' ठेवले जाईल. सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीची 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 1600 लोकांवर चाचणी घेत आहे. तसेच, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देखील मुलांवर चाचण्या आयोजित करू इच्छित आहे. अशा परिस्थितीत नोव्हाव्हॅक्सची लस भारतात आपत्कालीन मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नोव्हाव्हॅक्स लॅबमध्ये तयार केलेल्या प्रोटीनच्या नमुन्यांपासून तयार केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या इतर काही लसींपेक्षा ही वेगळी आहे. नोव्हाव्हॅक्स लस रेफ्रिजरेटरचे मानक तापमानावर ठेवली जाऊ शकते आणि वितरण करणे सोपे आहे.

चाचणीत ही लस केंटमध्ये आढळलेल्या अल्फा व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे दिसून आले. मात्र, या लसीचा प्रभाव 86 टक्के नोंदविला. दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या व्हेरिएंटविरुद्ध नोव्हाव्हॅक्सचा प्रभाव 49 टक्के आहे. या लसीचे दुष्परिणाम सौम्य असल्याचे दिसून आले. दरम्यान, एका अधिकाऱ्यांने सांगितले की, जर नियामक प्रक्रिया सुरळीत पार पडल्या तर सरकार 'कोवाव्हॅक्स'च्या पुरवठ्याच्या पहिल्या खेपेसाठी ऑगस्ट-सप्टेंबरची डेडलाइन पाहत आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुलांवर नोव्हाव्हॅक्स लसीची क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यास तयार असल्याचे नीती आयोगाचे सदस्य आणि लसीवरील उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. व्हीके पॉल यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. तर भारत बायोटेकला यासाठी यापूर्वीच परवानगी मिळाली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सप्टेंबर 2021 पर्यंत नोव्हाव्हॅक्स भारतात 'कोवाव्हॅक्स' नावाने सुरू करण्याविषयी बोलले होते.

अदर पूनावाला म्हणाले होते की, "नोव्हाव्हॅक्सने अखेर भारतात चाचण्या सुरू केल्या आहेत. ही लस सीरम इन्स्टिट्यूट आणि नोव्हाव्हॅक्स यांच्यात 'कोवाव्हॅक्स' नावाने लस बनविण्याचा करार आहे. कोरोना व्हायरसवर आफ्रिकन आणि युनायटेड किंगडममध्ये या लसीचा उपयोग करण्यात आला आहे आणि याची ओव्हरऑल एफिकेसी 89% आहे. आशा आहे की, आम्ही सप्टेंबर 2021 पर्यंत ही लस लाँच करू."

Web Title: Novavax Vaccine: 90 percent efficacy novavax centre looking to fast track rollout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.