पेपरफुटीनंतर एनटीएचा 'रिव्हेंज मोड'; NEETचा कठीण पेपर काढणार असल्याचा खान सरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 00:06 IST2026-05-13T00:02:41+5:302026-05-13T00:06:24+5:30
NEET रद्द झाल्याने खान सर संतप्त; NTA च्या कारभारावर आणि पेपरफुटीवर ओढले ताशेरे

पेपरफुटीनंतर एनटीएचा 'रिव्हेंज मोड'; NEETचा कठीण पेपर काढणार असल्याचा खान सरांचा दावा
Khan Sir on NEET-UG 2026: नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द झाल्याने देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. मुलांच्या १० रुपयांच्या डायपरमधून गळती होत नाही, पण एनटीएचे पेपर फुटतात, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी प्रशासनावर टीका केली.
NTA नाही, ही तर Never Trustable Agency
खान सर म्हणाले की, ज्या एजन्सीवर देशाच्या भविष्याची जबाबदारी सोपवली आहे, त्यांना परीक्षा घ्यायची आहे की पेपर फोडायचे, हेच समजत नाहीये. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नाव बदलून आता नेव्हर ट्रस्टेबल एजन्सी करायला हवे," असा टोला त्यांनी लगावला. हायटेक सुरक्षेचे दावे करूनही वारंवार पेपर फुटत असल्याने त्यांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले .
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर
परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर खान सरांनी चिंता व्यक्त केली. ज्या विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा जास्त गुण मिळण्याची अपेक्षा होती, ते आता नैराश्यात आहेत. खान सरांनी एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगितली, ज्याच्या आईचे जानेवारीत निधन झाले होते, पण तो केवळ डॉक्टर होण्याच्या जिद्दीने अभ्यास करत होता. आता अशा विद्यार्थ्यांना आम्ही कोणत्या तोंडाने सामोरे जाणार? असा प्रश्न त्यांनी विचारला.
मुलींसमोरचे संकट
अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींसाठी ही परीक्षा म्हणजे शिक्षणाची शेवटची संधी असते. पेपर फुटीमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासाच्या गतीवर टीका
सीबीआय तपासाबाबत बोलताना खान सर म्हणाले की, जर हा तपास असाच चालत राहिला, तर मुलांची एमबीबीएस पूर्ण होईल पण तपास संपणार नाही. या प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
गरीब कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले
एनटीएचे लोक कोट्यधीश आहेत, ते एसी रूममध्ये बसतात. पण रस्त्यावर हातगाडी चालवणाऱ्या बापाच्या मुलाचा विचार कोण करणार? असा सवाल खान सरांनी केला. अनेक पालकांनी कर्ज काढून मुलांच्या कोचिंग आणि प्रवासाचा खर्च उचलला आहे. आता पुन्हा १५०० किमी लांब परीक्षेला पाठवणे या कुटुंबांना परवडणारे नाही, असेही ते म्हणाले.
खान सरांनी कोचिंग इंडस्ट्रीतील काही लोकांवरही निशाणा साधला आहे. केवळ टॉपर बनवून नफा कमवण्याचे व्यावसायिक मॉडेल काही जण राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पेपर फुटल्यानंतर जेव्हा पुन्हा परीक्षा घेतली जाते, तेव्हा एनटीए रिव्हेंज मोडमध्ये येऊन अत्यंत कठीण पेपर सेट करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण अधिकच वाढतो, असेही त्यांनी सांगितले.