नीटचा घोळ, विद्यार्थ्यांचे हाल; पुनर्परीक्षेने कोटात पुन्हा वाढली विद्यार्थ्यांची वर्दळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 08:22 IST2026-05-19T08:22:33+5:302026-05-19T08:22:41+5:30
सुट्ट्या अर्धवट सोडून परतले स्पर्धक; सुटकेचा निःश्वास क्षणिक; पुनर्परीक्षेसाठी ‘कोचिंग राजधानी’त पुन्हा अभ्यासाचे वातावरण

नीटचा घोळ, विद्यार्थ्यांचे हाल; पुनर्परीक्षेने कोटात पुन्हा वाढली विद्यार्थ्यांची वर्दळ
कोटा : नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास घेत कोटाला निरोप दिला होता, तेच विद्यार्थी आता पुन्हा एकदा ‘कोचिंग राजधानी’कडे परतू लागले आहेत. २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेच्या घोषणेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी सुट्ट्या अर्धवट सोडून पुन्हा वसतिगृह गाठले आहे. परीक्षा संपल्याची मानसिक तयारी झाल्यानंतर अचानक पुन्हा अभ्यासाच्या शर्यतीत उतरावे लागल्याने विद्यार्थ्यांवर भावनिक आणि मानसिक ताण वाढल्याचे चित्र दिसत आहे.
लखनौची विद्यार्थिनी अनामिका वर्मा नीट परीक्षा झाल्यानंतर घरी परतली होती. मात्र, पुनर्परीक्षेच्या घोषणेनंतर तिने पुन्हा कोटामध्ये परतण्याचा निर्णय घेतला. "घरी अभ्यास होत नाही. कोटातील वातावरणच वेगळे आहे. इथे अभ्यासाची गती कायम राहते," असे ती म्हणाली. तिच्यासारखेच अनेक विद्यार्थी पुन्हा हॉस्टेलमध्ये परतत आहेत. कोटातील शिस्तबद्ध दिनचर्या, स्पर्धात्मक वातावरण, अभ्यासाचा दबाव आणि समान ध्येयासाठी झटणारे विद्यार्थी हेच अनेकांना पुन्हा शहराकडे खेचत असल्याचे दिसून येत आहे.
सुट्ट्यांचे नियोजनही कोलमडले
मध्य प्रदेशची विद्यार्थिनी अंशिका गुरेया सांगते की, नीट परीक्षा दिल्यानंतर आम्ही आराम केला होता. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजनही केले होते. पण परीक्षा रद्द झाल्याचे कळताच सगळाच मूड बदलला. तिच्या कुटुंबाने अनेक महिन्यांपासून पुढे ढकललेली सहलही रद्द करावी लागली. अभ्यासासाठी पुन्हा कोटामध्ये परतण्याचा निर्णय तिने घेतला. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा केवळ शैक्षणिक धक्का नसून, दीर्घ काळाच्या तणावानंतर मिळालेला विश्रांतीचा क्षण अचानक हिरावला गेल्याची भावना आहे.
दूरच्या राज्यांतील विद्यार्थ्यांचा
ऑनलाइन अभ्यासावर भर
राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील विद्यार्थी पुन्हा कोटात परतताना दिसत असले, तरी दूरच्या राज्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासाचा पर्याय स्वीकारला आहे. रांचीची विद्यार्थिनी दीक्षा पांडे म्हणाली, फक्त एका महिन्यासाठी पुन्हा कोटात जाणे व्यवहार्य वाटले नाही. पण घरी कोटासारखे वातावरण नाही. त्यामुळे मानसिकदृष्ट्या पुन्हा अभ्यास सुरू करणे आव्हानात्मक ठरत आहे. ती म्हणाली, परीक्षा संपल्याची मानसिक तयारी झाल्यानंतर पुन्हा तितक्याच तीव्रतेने अभ्यास सुरू करणे विद्यार्थ्यांसाठी तणावपूर्ण ठरत आहे.
हॉस्टेलमध्ये पुन्हा उजळले दिवे
कोटातील हॉस्टेल मालकांच्या मते, गेल्या काही दिवसांत चौकशी आणि परतणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. विशेषतः शेजारील राज्यांतील विद्यार्थी पुन्हा शहरात दाखल होत आहेत. दरवर्षी कोटामध्ये सुमारे १.२ लाख विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यापैकी जवळपास निम्मे विद्यार्थी नीट परीक्षेचे असतात.
परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांपूर्वी ज्या हॉस्टेल खोल्यांमध्ये सुट्ट्यांच्या चर्चा रंगल्या होत्या, त्याच खोल्यांमध्ये आता पुन्हा मॉक टेस्ट, कट-ऑफ आणि अभ्यासाचे नियोजन सुरू झाले आहे.
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस
नवी दिल्ली : नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. संसदीय स्थायी समितीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संसद आणि समितीचा अवमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना पाठविलेल्या पत्रात जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, १५ मे रोजी नीट पेपरफुटी प्रकरणावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत धर्मेंद्र प्रधान यांनी संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींबाबत विचारलेल्या प्रश्नावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. पत्रकार परिषदेत प्रधान म्हणाले होते की, संसदीय स्थायी समितीच्या निरीक्षणांवर मी भाष्य करणार नाही. त्या समितीत विरोधी पक्षांचे सदस्य आहेत. ते विशिष्ट पद्धतीने गोष्टी लिहितात, हे तुम्हालाही माहिती आहे.
या वक्तव्यामुळे संसदीय समित्यांची प्रतिष्ठा कमी झाल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे. संसदीय समित्या या संसद व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून त्या ‘मिनी संसद’ म्हणून ओळखल्या जातात. अशा समित्यांबद्दल अवमानकारक उल्लेख करणे म्हणजे संसदेचाच अवमान असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले.
प्रा. मोटेगावकरला
अटक, का व कशी?
तपासाअंती पेपरफुटीचे संघटितपणे रॅकेट चालविणाऱ्या गटात आरसीसी क्लासेसचा संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर सहभागी असल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.
मोबाईल आणि त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे मोटेगावकरला परीक्षेच्या आधीच पेपर मिळाला होता, हे स्पष्ट होत आहे. त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्न व उत्तरपत्रिका होती. नीट परीक्षेच्या पेपर सेटरशी त्याचा संपर्क आलेला आहे. मिळालेला पेपर त्यांनी पुढे कोणाला दिला, हे अजूनही त्याने सांगितले नाही. त्यामुळे तपासासाठी अटक करून कोठडी आवश्यक असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. त्याच्याकडे आलेला प्रश्नसंच व इतर माहिती मोटेगावकरने डिलिट करण्याचा प्रयत्न केल्याचेही सीबीआयचे म्हणणे आहे.
अटक कशी झाली?
१५ मे रोजी लातूर येथे निवासस्थानी जवळपास नऊ तास चौकशी झाली. सराव प्रश्नपत्रिका, मोबाईल व डिजिटल पुरावे घेऊन पथक परत गेले.
१७ मे रोजी ते चौकशीसाठी पुणे येथे सीबीआय कार्यालयात दाखल झाला. तिथे त्याची सुमारे ११ तास चौकशी चालली. त्यानंतर सीबीआयने त्यास अटक करून न्यायालयात हजर केले.