आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असलेला बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू लिटन दास याने फ्रँचायझीसोबतच्या आपल्या अनुभवाबाबत मोठा खुलासा केला. "मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोलकाताच्या संघाने कधीच माझ्यावर विश्वास दाखवला नाही. कदाचित त्यांना माझी गरजच नव्हती," अशा शब्दांत लिटन दासने केकेआर व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला. लिटन दासच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ माजली.
आयपीएल २०२३ च्या हंगामात सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये लिटन दासला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. खेळाडूंच्या मानसिक तयारीबाबत बोलताना तो म्हणाला की, "साधारणपणे खेळाडूंना पुढील सामना खेळणार असल्याबद्दल आधीच कल्पना दिली जाते; मात्र माझ्याबाबत तसे घडले नाही. कोणताही पूर्वसंवाद न होता, अचानक सामन्याच्या आदल्या रात्री ११ वाजता मला एक मेसेज आला, ज्यात 'उद्या तू खेळणार आहेस' असे लिहिले होते." ऐनवेळी मिळालेल्या या संदेशामुळे खेळाडूची पुरेशी मानसिक तयारी होऊ शकली नाही, असे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.
पदार्पणाचा सामना ठरला अखेरचा
लिटन दासने २० एप्रिल २०२३ रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपल्या आयपीएल कारकिर्दीचे पदार्पण केले. या सामन्यात जेसन रॉयसोबत त्याने डावाची सुरुवात केली, परंतु अवघ्या ४ धावांवर तो बाद झाला. फलंदाजीशिवाय यष्टीरक्षण करतानाही त्याच्याकडून काही महत्त्वाच्या चुका झाल्या, ज्यामध्ये त्याने स्टम्पिंगच्या मोक्याच्या संधी गमावल्या. या सामन्यात केकेआरला ४ विकेट राखून पराभव स्वीकारावा लागला आणि या सुमार कामगिरीनंतर लिटनला संघातून तात्काळ वगळण्यात आले, त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही. आपल्या खराब कामगिरीबद्दल बोलताना लिटन म्हणाला की, “मी सर्वोत्तम प्रयत्न केला. क्रिकेटमध्ये काही दिवस तुमच्या बाजूने असतात, तर काही दिवस नसतात. दुर्दैवाने तो दिवस माझ्यासाठी चांगला नव्हता.”
केकेआरमधील सततचे प्रयोग आणि अचानक एक्झिट
त्या काळात केकेआरचा संघ सातत्याने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करत होता आणि परदेशी खेळाडूंच्या विविध संयोजनांवर प्रयोग सुरू होते. याच दरम्यान, पदार्पणानंतर अवघ्या काही दिवसांतच कौटुंबिक वैद्यकीय कारणांमुळे लिटन दासला अचानक बांगलादेशला परतावे लागले. त्यावेळी केकेआरने अधिकृत निवेदन जारी करत त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या होत्या. पुढे शाकिब अल हसननेही स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे संघात मोठे बदल करण्यात आले आणि लिटन दासच्या जागी संघात जॉनसन चार्लेसची एन्ट्री झाली.
संघ व्यवस्थापनाच्या संवादावर प्रश्नचिन्ह
लिटन दासची आयपीएल कारकीर्द केवळ एका सामन्यापुरतीच मर्यादित राहिली असली, तरी त्याने आता केलेल्या विधानांमुळे केकेआरच्या संघ व्यवस्थापनाची कार्यपद्धती आणि खेळाडूंशी असणारा संवाद यावर मोठे प्रश्न उपस्थित झाले. विशेषतः संघात येणाऱ्या परदेशी खेळाडूंचा ताळमेळ कसा बसवला जातो? त्यांची मानसिक तयारी आणि व्यवस्थापनातील स्पष्ट संवाद या मुद्द्यांवरून आता क्रिकेट विश्वात नवी चर्चा रंगू लागली.