वृद्ध लिफ्टच्या डक्टमध्ये अडकला; दहा दिवस थांगपत्ता नाही, दुर्गंधीमुळे घटनेचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:26 IST2026-01-19T15:24:39+5:302026-01-19T15:26:29+5:30
पॉश सोसायटीतील भयावह प्रकार; व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप

वृद्ध लिफ्टच्या डक्टमध्ये अडकला; दहा दिवस थांगपत्ता नाही, दुर्गंधीमुळे घटनेचा उलगडा
भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील मिसरोद पोलीस ठाणे क्षेत्रातील चिनार ड्रीम सिटी या पॉश वसाहतीत राहणाऱ्या ७७ वर्षीय वृद्धाचा लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह तब्बल १० दिवस लिफ्टच्या डक्टमध्ये पडून होता, ज्यामुळे लिफ्ट वारंवार वर-खाली आल्याने मृतदेह चिरडला गेला.
दुर्गंधीमुळे झाला घटनेचा उलगडा
या दुर्दैवी घटनात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव गिरी गोस्वामी (वय ७७) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० दिवसांपूर्वी गिरी गोस्वामी घरातून बाहेर पडले होते, मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत. याबाबत कुटुंबीयांनी मिसरोद पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवली, मात्र कोणताही थांगपत्ता लागू शकला नाही. दरम्यान, सोसायटीतील लिफ्टमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर रहिवाशांना संशय आला. लिफ्ट तपासली असता, लिफ्टच्या डक्टखाली वृद्धाचा मृतदेह आढळून आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
लिफ्ट कोसळल्याने जागीच मृत्यू
कुटुंबीयांनी सांगितले की, गिरी गोस्वामी काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. ते सोसायटीच्या लिफ्टमध्ये चढताच लिफ्ट थेट खड्ड्यात कोसळली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र हा अपघात इतक्या बंदिस्त ठिकाणी घडल्याने बराच काळ कोणालाही याची कल्पना आली नाही.
सोसायटी व्यवस्थापनावर गंभीर आरोप
या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी व्यवस्थापनावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, चिनार ड्रीम सिटीमधील लिफ्ट्स अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत होत्या. याबाबत वारंवार तक्रारी करूनही व्यवस्थापनाने दुरुस्ती किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. रहिवाशांचे म्हणणे आहे की, वेळीच लिफ्टची तपासणी आणि देखभाल झाली असती, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच लिफ्ट देखभाल, सोसायटी व्यवस्थापनाची जबाबदारी आणि सुरक्षेतील त्रुटी यांचा तपास केला जात आहे.