देशात LPG टंचाईचं संकट; पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, काय ठरलं? कशी आहे देशाची स्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:58 IST2026-03-10T16:56:19+5:302026-03-10T16:58:11+5:30
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा रोखल्याने भारतसह अनेक आशियाई देशांत गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे.

देशात LPG टंचाईचं संकट; पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, काय ठरलं? कशी आहे देशाची स्थिती?
देशात सध्या एलपीजी सिलेंडर्सची टंचाई निर्माण होत असल्याच्या बातम्या आहेत. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 'एस्मा' (ESMA) लागू केला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही उपस्थित होते. खरेतर, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुले ही परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा रोखल्याने भारतसह अनेक आशियाई देशांत गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे.
घरगुती ग्राहकांना सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर -
केंद्र सरकारचा मुख्य भर घरगुती ग्राहकांना सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आहे. यासाठी औद्योगिक युनिट्स आणि व्यावसायिक सिलेंडर्सच्या पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. हॉटेल इंडस्ट्रीने या निर्णयावर आक्षेप घेतला असून, व्यावसायिक सिलेंडर्स न मिळाल्यास कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारताला होणारा बहुतांश तेल आणि गॅस पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो, यामुळे आगामी काही दिवस अत्यंत महत्वाचे असतील.
भारत आपल्या गरजेच्या एकूण एलपीजी पैकी ६२ टक्के आयात करतो -
गॅस आणि तलाचा विचार करता, भारत आपल्या गरजेच्या एकूण एलपीजी पैकी ६२ टक्के आयात करतो. शिवाय, तेलावरील त्याचे अवलंबित्व जवळपास ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत, जर होर्मुझची सामुद्रधुनी जास्त काळ बंद राहिली तर संकट आणखी वाढेल.
देशाच्या एकूण एलपीजी वापरात घरगुती ग्राहकांचा वाटा ८७% -
भारत सध्या त्याच्या गरजेच्या अंदाजे ८५% गॅस सौदी अरेबियाकडून खरेदी करतो. ही आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाते, जी सध्या बंद आहे. संकट अधिकच गडद होत चालले आहे आणि सरकार सध्या पर्यायी पुरवठा मार्गांचा शोध घेत आहे. भारत दरवर्षी अंदाजे ३१.३ दशलक्ष टन एलपीजी वापरतो. देशाच्या एकूण एलपीजी वापरात घरगुती ग्राहकांचा वाटा ८७% आहे, त्यानंतर उद्योग, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचा वाटा १३% आहे. गॅसवरील वाढते अवलंबित्व पाहता, सरकारने 'एस्मा' लागू करून पुरवठ्याचे वर्गीकरण करत या समस्येला प्राधान्य दिले आहे.