लिव्ह-इनमध्ये राहिलात अन् मूल झालं, मग तो बलात्कार कसा? कोर्टाची टिप्पणी, महिलांना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:59 IST2026-04-27T13:59:37+5:302026-04-27T13:59:37+5:30

लिव्ह-इनशी संबंधित एका प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.

Long term Consensual Live in Relationship Cannot be Termed as Rape After Breakup Supreme Court | लिव्ह-इनमध्ये राहिलात अन् मूल झालं, मग तो बलात्कार कसा? कोर्टाची टिप्पणी, महिलांना दिला सल्ला

लिव्ह-इनमध्ये राहिलात अन् मूल झालं, मग तो बलात्कार कसा? कोर्टाची टिप्पणी, महिलांना दिला सल्ला

Supreme Court on Live-in Relationship: "लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे, संमतीने शरीरसंबंध ठेवायचे आणि दुरावा निर्माण झाला की बलात्काराचे आरोप करायचे, हे आता सर्रास होऊ लागले आहे. जर संबंध संमतीने होते आणि त्यातून अपत्यही जन्माला आले असेल, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही," अशा स्पष्ट आणि कडक शब्दांत सुप्रीम कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वादावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

नेमकी घटना काय?

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. एका पीडित महिलेने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ही महिला १८ व्या वर्षी विधवा झाली होती, त्यानंतर ती आरोपीच्या संपर्कात आली. दोघेही  पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते आणि त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, नंतर तो पुरुष आधीच विवाहित असल्याचे समोर आले आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.

लग्नाआधी एकत्र का राहिलात? न्यायमूर्तींचा सवाल

सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी विचारले की, "लग्नाचे वचन दिले होते तर मग लग्नाआधीच एकत्र राहण्याचा निर्णय का घेतला? असे प्रश्न विचारले पीडितेलाच दोषी धरल्याचा आरोप होतो, पण लिव्ह-इनच्या प्रकरणात वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे." त्यावर महिलेच्या वकिलांनी सांगितले की, तो पुरुष आधीच विवाहित होता आणि त्याने ४ लग्ने केली होती. तेव्हा कोर्टाने स्पष्ट केले की, "आम्हाला इतर महिलांशी देणेघेणे नाही, याचिकाकर्त्या महिलेने दिलेल्या संमतीशी आहे."

"लिव्ह-इनमध्ये राहणे हा एक मोठा धोका"

"लग्नाशिवाय राहण्याचे धोके आहेत. जर हे जोडपे विवाहित असते, तर महिलेला देखभाल खर्च आणि इतर कायदेशीर अधिकार मिळाले असते. पण या प्रकरणात केवळ संमतीने एकत्र राहत होते. वर्षानुवर्षे एकत्र राहून मूल जन्माला घातल्यानंतर, जोडीदार सोडून गेला तर त्याला फौजदारी गुन्हा किंवा बलात्कार ठरवता येणार नाही."

संमती होती, तर गुन्हा कुठे?

न्यायमूर्तींनी पुढे सांगितले की, अनेकदा लिव्ह-इनमध्ये संबंध तुटल्यानंतर महिला बलात्काराच्या तक्रारी करतात. "तिची फसवणूक झाली म्हणून आम्हाला त्या महिलेबद्दल सहानुभूती असू शकते पण हे नाते संमतीचे होते आणि त्यातून मूल जन्माला आले, त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही. लग्न नसल्यामुळे जोडीदार कधीही वेगळा होऊ शकतो आणि हे वेगळे होणे गुन्हा नाही," असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
 

Web Title : लिव-इन, बच्चा, बलात्कार नहीं: अदालत की टिप्पणी, महिलाओं को सलाह।

Web Summary : सुप्रीम कोर्ट: सहमति से लिव-इन संबंध, जिसके परिणामस्वरूप बच्चे होते हैं, अलगाव पर बलात्कार नहीं कहे जा सकते। अदालत ने लिव-इन व्यवस्था के जोखिमों पर जोर दिया, महिलाओं को विवाह द्वारा प्रदान की जाने वाली कानूनी सुरक्षा पर विचार करने की सलाह दी।

Web Title : Live-in relationship, child, not rape: Court's comment, advice to women.

Web Summary : Supreme Court: Consensual live-in relationships, resulting in children, cannot be termed rape upon separation. The court emphasized the risks of live-in arrangements, advising women to consider legal protections marriage offers.