केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:46 IST2025-06-18T15:46:18+5:302025-06-18T15:46:54+5:30
Kedarnath News: या अपघातात एक भाविक बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.

केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
Kedarnath News:उत्तराखंडमधीलकेदारनाथ येथून मोठी बातमी आली आहे. केदारनाथ मार्गावर जाणाऱ्या काही भाविकांचा भीषण अपघात झाला, ज्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर तीन जखमी आहेत. तसेच, एकजण अजून बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच डीडीआरएफला घटनास्थळी पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी(१८ जून) मध्यरात्री १२ वाजता घडली. केदारनाथला जाणारे काही लोक गौरीकुंड आणि रामबाडा दरम्यान जंगल चट्टी परिसरात थेट डोंगरावरुन खाली खंदकात कोसळले. या घटनेची माहिती मिळताच डीडीआरएफचे पथक आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. पथकाने दोघांचे मृतदेह काढले आहेत.
रविवारीही एका प्रवाशाचा मृत्यू
यापूर्वी, रविवार(१५ जून) रोजी प्रवाशांसोबत अपघात झाला होता. मुसळधार पावसामुळे अचानक पावसाळी नाल्यात ढिगारा वाहून आल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. त्यानंतर सोनप्रयागकडून केदारनाथला जाणाऱ्या पायी प्रवासावरही काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती.
प्रशासनाचे भाविकांना आवाहन
उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा जारी केला आहे. पावसामुळे तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत, प्रवाशांनी हवामान अंदाजानुसार प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.