Kashmiri woman sentiment tells Rahul Gandhi tearfully in a plane | VIDEO-राहुल गांधींसमोरच काश्मिरी महिलेच्या भावनांचा फुटला बांध, सांगितली आपबिती
VIDEO-राहुल गांधींसमोरच काश्मिरी महिलेच्या भावनांचा फुटला बांध, सांगितली आपबिती

नवी दिल्लीः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळारूनच दिल्लीला पाठवण्यात आले. काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी व स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी हे नेते निघाले असतानाच विमानातील एका काश्मिरी महिलेनं काश्मीरमध्ये मोदी सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला आहे. राहुल गांधींसमोरच काश्मिरी महिलेच्या भावनांचा बांध फुटला असून, तिनं सर्व हकीकत राहुल गांधींना सांगितली आहे.

ती म्हणाली, लहान लहान मुलं घराच्या बाहेर निघू शकत नाहीत. माझा भाव हार्ट पेशंट आहे. आम्ही फारच दुःखात आहोत, अशा प्रकारे त्या महिलेच्या भावनांना पाझर फुटला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. अजून असं किती काळ चालणार आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली शांत आणि चिरडलेल्या जनतेपैकी हा फक्त एकाचा आवाज आहे. विरोधक काश्मीरच्या मुद्द्यावर राजकारण करत असलेल्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहा, असं आव्हानचं प्रियंका गांधींनी मोदी सरकारला केलं आहे. तत्पूर्वी काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला, अशी टीका राहुल गांधी यांनी दिल्लीत केली होती. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती अतिशय वाईट आहे, असे आम्हाला विमानातील प्रवाशांनीच सांगितले, पण केंद्र सरकार हे देशातील जनतेपासून लपवू पाहत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांची ही गळचेपी असल्याचा आरोप सीताराम येचुरी यांनी केला.

राहुल गांधी यांच्यासह आनंद शर्मा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे टी शिवा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, मनोज झा, माजिद मेमन, शरद यादव हे नेते होते. दुपारी त्यांचे विमान श्रीनगर विमानतळावर अडवून तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना सांगितले.


Web Title: Kashmiri woman sentiment tells Rahul Gandhi tearfully in a plane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.