“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:56 IST2026-04-16T11:53:31+5:302026-04-16T11:56:12+5:30
Iran India Relations: इस्रायल ४० वर्षांपासून इराणशी युद्ध करण्याच्या विचारात होते. हे युद्ध वैयक्तिक आहे, असा दावा इराणच्या नेत्यांनी केला.

“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
Iran India Relations: इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाला वैयक्तिक युद्ध म्हटले आहे. इस्रायल गेल्या ४० वर्षांपासून हे युद्ध घडवून आणू पाहत आहे, असा आरोप करताना इराणसोबतभारताचे संबंध अधिक दृढ करण्याबद्दलही भाष्य केले. इलाही यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा आखाती देशांमध्ये तणाव वाढला असून तो रोखण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत.
जयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना इराणचे भारतातील प्रतिनिधी इलाही म्हणाले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गेल्या ४० वर्षांपासून इराणविरुद्ध युद्ध करण्यासाठी निमित्त शोधत होते. इस्रायल आजपर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा मुद्दा पटवून देऊ शकला नव्हता. परंतु, यावेळेस इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाचा मुद्दा पटवून दिला. हे एक वैयक्तिक युद्ध आहे, असा दावा त्यांनी केला.
भारतासोबतचे आमचे संबंध ५,००० वर्षांपूर्वीचे आहेत
भारत आणि इराण यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करत इलाही यांनी सांगितले की, भारतासोबतचे आमचे संबंध ५,००० वर्षांपूर्वीचे आहेत. हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि तात्विक संबंध आहेत. भारतासोबतचे आमचे संबंध संस्कृतीवर आधारित आहेत. भारत आणि इराण यांचे संबंध खूप घट्ट आहेत आणि युद्धानंतर हे संबंध आणखी दृढ आणि सखोल होतील.
दरम्यान, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, लेबनॉनमधील सर्वसमावेशक युद्धविरामाची पूर्तता आणि दृढीकरण हे हिजबुल्लाहचा दृढनिश्चय आणि संघर्ष, त्यांची शौर्यगाथा आणि प्रतिकार गटाच्या एकतेचा परिणाम असेल. अमेरिकेने या कराराचा सन्मान केलाच पाहिजे. युद्ध असो वा युद्धविराम, प्रतिकार गट आणि इराण एकच आत्मा आहेत. अमेरिकेने इस्रायलच्या पहिल्या चुकीपासून माघार घेतली पाहिजे.