ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:03 IST2026-04-16T13:02:27+5:302026-04-16T13:03:10+5:30
ओडिशा कोर्टाचा निकाल: पाक एजंटना माहिती पुरवणाऱ्या ७ जणांना ३ वर्षांची जेल

ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
आपल्या देशाची गुप्त माहिती सीमापार शत्रूंच्या हातात सोपवणे ओडिशातील सात जणांना चांगलेच महागात पडले आहे. पाकिस्तानी एजंटना संवेदनशील माहिती आणि ओटीपी पुरवल्याप्रकरणी ओडिशातील एका न्यायालयाने बुधवारी मोठा निकाल दिला. या सातही दोषींना प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवले होते. हे सिम कार्ड सक्रिय केल्यानंतर, त्याद्वारे येणारे ओटीपी आणि इतर संवेदनशील माहिती ते पाकिस्तानातील गुप्तचर एजंटना पुरवत असत. या बदल्यात त्यांना मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आले होते. ओडिशा पोलिसांच्या विशेष कृती दलाने या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
दोषींची नावे आणि ठिकाणे
सदर प्रकरणात शिक्षा झालेल्यांमध्ये प्रीतम कर, सौम्य रंजन पटनायक (दोघेही जाजपूर), पथानी सामंत लेंका, सरोज कुमार नायक, प्रद्युम्न साहू (तिघेही नयागड), पुण्याचा अभिजित संजय आणि गुवाहाटीचा इक्बाल हुसेन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील पुण्यातील आरोपीने पाकिस्तानी एजंट आणि या टोळीमध्ये मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.
छापेमारीत काय सापडले?
एसटीएफने जेव्हा या आरोपींच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या, तेव्हा तिथे मिळालेले साहित्य पाहून पोलीसही चक्रावून गेले. त्यांच्याकडून १९ महागडे मोबाईल फोन, ४७ सक्रिय सिम कार्ड, ६१ एटीएम कार्ड आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. हे सर्व साहित्य देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी वापरले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
इंटरपोलचीही मदत, पण पाकिस्तानचा आडमुठेपणा
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने ओडिशा पोलिसांनी 'इंटरपोल'मार्फत पाकिस्तानकडे अधिक माहिती मागितली होती. मात्र, नेहमीप्रमाणे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या तपासात सहकार्य करण्यास नकार दिला. तरीही, एसटीएफने सबळ पुराव्यांच्या आधारे कोर्टात बाजू मांडली आणि सातही आरोपींना गजाआड धाडण्यात यश मिळवले.