Hathras's dead rape victim was cremated by the police | हाथरसच्या मृत बलात्कार पीडितेवर पोलिसांनी परस्पर केले अंत्यसंस्कार

हाथरसच्या मृत बलात्कार पीडितेवर पोलिसांनी परस्पर केले अंत्यसंस्कार

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात निर्घृणपणे सामूहिक बलात्कार करण्यात आलेल्या व त्यात गंभीर जखमी झाल्याने मरण पावलेल्या दलित मुलीच्या मृतदेहावर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर परस्पर अंत्यसंस्कार उरकून घेतले. यावेळी पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरात डांबून ठेवले होते. या उद्वेगजनक प्रकारामुळे हाथरसमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. अखेर, पोलिसांना त्यांच्यावर लाठीमार करावा लागला.
या प्रकाराबाबत काँग्रेस, बसप, समाजवादी पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, भीम आर्मी या विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशभरात ठिकठिकाणी या कृत्याचा निषेध करण्यात आला.

पीडितेचा मृतदेह तिच्या गावात आणला, तेव्हा पोलीस व मुलीच्या नातेवाइकांची बाचाबाची झाली. नातेवाईक रुग्णवाहिकेसमोर उभे राहिले. काही बॉनेटवर चढले. पोलिसांनी या नातेवाइकांना हटवून त्यांच्या घरात डांबून ठेवले. मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर अडीच वाजता त्या मुलीच्या मृतदेहावर पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केले. मुलीच्या अंत्यसंस्कारापासून वंचित ठेवल्याने मुलीच्या आईने धाय मोकलून रडत शोक व्यक्त केला. मुलीचे वडील, भाऊ बुधवारी पहाटे उपोषणास बसले, तेव्हा पोलीस त्यांना
गाडीत घालून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. (वृत्तसंस्था)

घर, २५ लाख देणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संध्याकाळी संवाद साधला. सरकारतर्फे पक्के घर, कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी आणि २५ लाखांची मदत करण्याचे आश्वासन दिले.

पंतप्रधानांचा फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना फोन केला. योगी यांनी लगेचच एसआयटीमार्फत या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी व दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hathras's dead rape victim was cremated by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.