Hathras Stampede : "माझ्या पत्नीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण भोले बाबांनी..."; पतीचा मोठा दावा, सांगितला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 01:32 PM2024-07-09T13:32:12+5:302024-07-09T13:39:21+5:30
Hathras Stampede : भोले बाबा यांचे भक्त दीपक यादव यांनी मोठा दावा केला आहे. करवा चौथच्या दिवशी त्यांची पत्नी संजू हिचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण भोले बाबा यांनी तिला पुन्हा जिवंत केलं असं म्हटलं आहे.
हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता भोले बाबा यांचे भक्त दीपक यादव यांनी मोठा दावा केला आहे. करवा चौथच्या दिवशी त्यांची पत्नी संजू हिचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण भोले बाबा यांनी तिला पुन्हा जिवंत केलं असं म्हटलं आहे. त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला भोले बाबा यांचा मंत्र असलेलं पाणी पाजलं तेव्हा ती पुन्हा जिवंत झाली असं म्हटलं आहे.
भोले बाबांबद्दल जग कितीही काही बोललं तरी आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी यांच्यामुळे आमच्या जीवनात बदल झाला असून आपण त्यांना देव मानतो आणि त्यांची पूजा करतो. दीपक यांनी न्यूज18 हिंदी याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या काळात भोले बाबा यांचा दरबार झाला नाही आणि बाबांनी दर्शनही दिलं नाही. पण जेव्हा कोरोनाचा प्रभाव कमी झाला तेव्हा राजस्थानच्या दौसा येथील दरबार भरणार असल्याची माहिती मिळताच हे जोडपं तिथे पोहोचले.
दर्शनानंतर दीपक यांची पत्नी संजूची तब्येत बिघडली आणि त्यानंतर संजूने तिच्यासोबत बसलेल्या इतर महिलांना आपल्याला बरं वाटत नसल्याचं सांगितलं. त्या महिलांनी संजूला बाहेर आणलं. पण तोपर्यंत संजू बेशुद्ध झाली होती. इतर लोकांनी संजूचे पती दीपकचा शोध घेतला आणि पत्नी बेशुद्ध झाल्याची माहिती दिली.
दीपक यादव यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी पत्नीला बेशुद्धावस्थेत पाहिलं तेव्हा काहीच हालचाल होत नव्हती. महिलांनी तिला जमिनीवर झोपवलं होतं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर संजूला मृत घोषित केलं. मात्र त्यानंतर भोले बाबांचा मंत्र सांगून दीपक यांनी पत्नीला पाणी दिलं आणि तिच्या शरीरात हालचाल झाली आणि पत्नी पुन्हा जिवंत झाली.
आरोग्यविषयक समस्या होत्या. पण भोले बाबांकडे गेल्यावर असलेला आजार बरा झाला. अनेक चमत्कार त्यांना त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळाले. त्यामुळेच पत्नी आणि कुटुंबासह सर्वच जण भगवान भोले बाबांची पूजा आणि आरती करतात असं देखील दीपक यांनी म्हटलं आहे.