Gas Tank Explosion at Hindustan Petroleum Corporation Plant in Unnao | उत्तर प्रदेशातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; परिसरात खळबळ
उत्तर प्रदेशातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; परिसरात खळबळ

उन्‍नाव: हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामुळे एक टाकी फुटल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये असलेल्या दहीचौकी परिसरात झालेल्या स्फोटानंतर परिसरात खळबळ माजली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटानंतर आसपासच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्फोट झाल्यानंतर प्लांटमध्ये आग लागली. यावेळी अनेक जण प्लांटमध्ये काम करत होते. त्यामुळे बरेच कर्मचारी आतमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. गॅसची टाकी फुटल्यानं परिसरात एकच घबराट पसरली. त्यामुळे पाच किलोमीटर परिसरातील गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास गावं रिकामी करावी लागू शकतात, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. 

स्फोटाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी लखनऊवरुन फोम टेंडर्स पाठवण्यात आले आहेत. उन्नाव, कानपूर आणि लखनऊमधील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वॉल्व्ह लीक झाल्यानं गॅस प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. 

Web Title: Gas Tank Explosion at Hindustan Petroleum Corporation Plant in Unnao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.