गॅस टंचाईचा भारतीय रेल्वेला मोठा फटका; ट्रेनमधील खानपान सेवा बंद करणार? स्टॉलचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:24 IST2026-03-11T14:21:30+5:302026-03-11T14:24:18+5:30

Indian Railway IRCTC News: रेल्वे स्थानकांवरील सर्व फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि 'जन आहार' आउटलेटना गॅस टंचाईचा फटका बसत असल्याचे म्हटले जात आहे.

gas shortage hits indian railways hard will catering services in trains and pantry car to be stopped and what will happen to the stall | गॅस टंचाईचा भारतीय रेल्वेला मोठा फटका; ट्रेनमधील खानपान सेवा बंद करणार? स्टॉलचे काय होणार?

गॅस टंचाईचा भारतीय रेल्वेला मोठा फटका; ट्रेनमधील खानपान सेवा बंद करणार? स्टॉलचे काय होणार?

Indian Railway IRCTC News: आखातातील इराण-अमेरिका, इस्रायल युद्धाचे परिणाम देशात दिसू लागले आहेत. मध्यपूर्वेतून होणारा ऊर्जा पुरवठा थांबल्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारनेही ५ मार्चला अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर निर्बंध आणले आहेत. सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने आणि भीतीमुळे नागिकांनी गॅस पुरवठा केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. एलपीजी गॅस सिलिंडर टंचाईचा रेल्वे स्टेशनवर असलेले स्टॉल चालकांना फटका बसत आहे. याबाबत IRCTCने कॅटरिंग आणि स्टॉल चालकांना महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

देशातील सध्या सुरू असलेल्या एलपीजी गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने रेल्वे स्थानकांवर केटरिंग सुविधांबाबत एक नवीन सूचना जारी केली आहे. संभाव्य पुरवठ्याच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी आयआरसीटीसीने केटरिंग ऑपरेटर्सना मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन सारख्या विद्युत उपकरणांचा वापर करण्यास सांगितले आहे. प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेडी-टू-ईटचा पुरेसा साठा ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 

फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि 'जन आहार' आउटलेटवर परिणाम

आयआरसीटीसीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, हे निर्देश ट्रेनमधील कॅटरिंग सेवेसाठी नाहीत, तर फक्त स्थानकांवर असलेल्या दुकानांसाठी आहे. नवीन नियमानुसार, गॅस टंचाईमुळे रेल्वे स्थानकांवर चालणाऱ्या स्टॉल्स आणि केटरिंग युनिट्सना आता त्यांच्या कामकाजात बदल करावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे. एलपीजीच्या कमतरतेमुळे प्रवाशांना दिलेल्या सेवांवर परिणाम होऊ नये. म्हणूनच मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन कुकिंगसारखे पर्याय त्वरित स्वीकारण्याची शिफारस आयआरसीटीसीने केली आहे. कोणत्याही युनिटमध्ये गॅस कुकिंग पूर्णपणे बंद केले असेल तर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विभागाला कळवणे बंधनकारक असणार आहे. हा नियम रेल्वे स्थानकांवरील सर्व फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि 'जन आहार' आउटलेटना लागू होईल.

दरम्यान, ट्रेनमधील पॅन्ट्री कारमध्ये प्रामुख्याने फक्त अन्न गरम केले जाते आणि वितरीत केले जाते. सुरक्षिततेच्या कारणास्तव एलपीजी सिलिंडर तेथे ठेवले जात नाहीत. स्टेशनच्या बेस किचनमध्ये एलपीजीच्या कमतरतेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी जेवण तयार करणे कठीण होत आहे. रेल्वे अधिकारी ट्रेनमध्ये शिजवलेल्या जेवणाची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा विचार करत आहेत. ज्या प्रवाशांनी तिकिटे बुक करताना आधीच जेवणाचे पैसे दिले आहेत, त्यांना परतफेड करण्याची योजना सुरू आहे.

 

Web Title : गैस संकट से भारतीय रेलवे प्रभावित; खानपान सेवाएं बंद?

Web Summary : एलपीजी गैस की कमी से रेलवे स्टॉल प्रभावित। आईआरसीटीसी ने माइक्रोवेव, इंडक्शन कुकर इस्तेमाल करने की सलाह दी। भोजन प्लाजा में बदलाव। ट्रेन में भोजन सेवा बंद हो सकती है; रिफंड की योजना है।

Web Title : Gas Shortage Hits Indian Railways; Catering Services May Halt?

Web Summary : LPG gas shortage impacts railway stalls. IRCTC advises using microwaves, induction cookers. Food plazas face changes. Train meal service may halt; refunds planned.