लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नोकरदारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) कोट्यवधी सदस्य आता ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’चा (यूपीआय) वापर करून आपल्या ईपीएफ खात्यातून थेट बँक खात्यात पैसे हस्तांतरित करू शकणार आहेत. या सुविधेची तांत्रिक चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असून, लवकरच ही सेवा सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केली.
या सुविधेचा देशातील ७ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे. सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन दावा (क्लेम) सादर करावा लागतो, त्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, नव्या प्रणालीत सदस्य खात्यात जमा असलेली आणि काढण्यास पात्र असलेली रक्कम थेट पाहू शकतील. त्यानंतर लिंक केलेला 'यूपीआय पिन' टाकून ही रक्कम सुरक्षितरीत्या आपल्या बँक खात्यात जमा करू शकतील.
स्वयंचलित प्रणालीची मर्यादा ५ लाखांवर!
सध्या सुरू असलेल्या स्वयंचलित क्लेम सेटलमेंट (ऑटोमेटेड सेटलमेंट) प्रणालीअंतर्गत दावा दाखल केल्यानंतर ३ दिवसांत पैसे कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होतात.
यात पैसे काढण्यासाठी असलेली १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून आता ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे लग्न, आजारपण किंवा शिक्षणासाठी पैसे विनाअडथळा उपलब्ध होण्यास मदत होईल.
व्हॉट्सॲपवर २४ तास सेवा
ईपीएफओने सेवा सुलभ करण्यासाठी 'व्हॉट्सॲप'वर ग्रीन टिक (व्हेरिफाईड नंबर) असलेली सेवा सुरू केली आहे. सदस्य नोंदणीकृत क्रमांकावरून 'हॅलो' पाठवून आपल्या स्थानिक भाषेत २४ तास तक्रारींचे निवारण किंवा माहिती मिळवू शकतील.
खटले निकाली काढण्यावर भर : मंत्री मांडविया यांनी सांगितले की, विशेष मोहिमेमुळे ग्राहक न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांची संख्या ४,९३६ वरून २,६४६ पर्यंत कमी करण्यात ईपीएफओला यश आले आहे.
Web Summary : EPFO members can soon transfer EPF funds directly via UPI. Successful testing paves way for quicker access, benefiting over 7 crore employees. Claim settlement limit increased to ₹5 lakh. WhatsApp service launched for 24/7 support.
Web Summary : ईपीएफओ सदस्य जल्द ही यूपीआई के माध्यम से सीधे ईपीएफ फंड ट्रांसफर कर सकेंगे। सफल परीक्षण से 7 करोड़ से अधिक कर्मचारियों को त्वरित पहुंच का लाभ मिलेगा। दावा निपटान सीमा बढ़ाकर ₹5 लाख की गई। 24/7 सहायता के लिए व्हाट्सएप सेवा शुरू की गई।