लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानातील इंधन नियंत्रण स्वीच संदर्भातील तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे अधिकारी अमेरिकेतील सिएटल येथे जूनमध्ये बोईंग कंपनीच्या प्रयोगशाळेत होणाऱ्या चाचण्यांचा अभ्यास करणार आहेत.
फेब्रुवारी २०२६ मध्ये लंडन ते बेंगळुरू या एअर इंडियाच्या एयआय १३२ विमान प्रवासादरम्यान इंजिन सुरू करताना इंधन नियंत्रण स्वीच चालू स्थितीत स्थिर राहत नसल्याचे वैमानिकांच्या निदर्शनास आले होते. दोन वेळा स्वीच योग्यरीत्या लॉक झाला नाही, मात्र, तिसऱ्या प्रयत्नात तो व्यवस्थित कार्यरत झाला. त्यानंतर विमान सुरक्षितपणे बंगळुरू येथे उतरवण्यात आले आणि संबंधित विमान तातडीने ग्राऊंड करण्यात आले होते. या घटनेनंतर एअर इंडियाने संबंधित मॉड्यूल बोईंगकडे तपासणीसाठी पाठविले. प्राथमिक तपासात डीजीसीए आणि बोईंगने हा स्वीच पूर्णतः कार्यक्षम असल्याचे म्हटले होते. मात्र, तरी खबरदारीचा उपाय म्हणून अधिक सखोल चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालात दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा बंद झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या इंधन नियंत्रण स्वीचच्या कार्यप्रणालीकडे विशेष लक्ष दिले
जात आहे.
Web Summary : After an Air India Boeing 787 fuel switch issue, DGCA will investigate at Boeing's US lab. A previous accident highlighted fuel supply concerns, prompting deeper scrutiny of the switch's function.
Web Summary : एयर इंडिया के बोइंग 787 ईंधन स्विच मुद्दे के बाद, डीजीसीए बोइंग की अमेरिकी प्रयोगशाला में जांच करेगा। पिछली दुर्घटना में ईंधन आपूर्ति की चिंता उजागर हुई, जिससे स्विच के कामकाज की गहन जांच हो रही है।