हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:05 IST2026-04-28T12:04:18+5:302026-04-28T12:05:03+5:30
दिल्लीत 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली असून यामध्ये दोन चुलत भावांना आपला जीव गमवावा लागला आहे.

फोटो - आजतक
दिल्लीत 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली असून यामध्ये दोन चुलत भावांना आपला जीव गमवावा लागला आहे. यज्ञ आणि अभव अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं असून ते आयपीएल (IPL) सामना पाहून बाईकवरून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.
अशोक रोडवर रात्री साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोघंही गंभीर जखमी झाले. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान दोन्ही भावांचा मृत्यू झाला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक रोडवर रात्री साडेदहाच्या सुमारास रस्ते अपघाताची माहिती मिळाली होती. एका अज्ञात वाहनाने बाईकस्वारांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही भाऊ रस्त्यावर फेकले गेले.
प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, सामना पाहून घरी परतत असताना अभवच्या वडिलांचा त्याला फोन आला होता. "आम्ही अर्ध्या तासात घरी पोहोचू" असं अभवने वडिलांना सांगितलं होतं. त्यावेळी ते अशोक रोडवरून जात होते, पण काही वेळातच एका अज्ञात वाहनाने त्यांना चिरडलं.
यज्ञ आणि अभव हे दिल्ली आणि बंगळुरू यांच्यातील आयपीएल सामना पाहून घरी परतत होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हा 'हिट अँड रन'चा प्रकार असल्याचं प्राथमिक तपासात दिसत असून आरोपीचा शोध सुरू आहे.