Rahul Gandhi : "जिथे भाजपाला पराभव दिसतो, तिथे मतदारच सिस्टीममधून गायब केले जातात"; राहुल गांधींचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:35 IST2026-01-25T09:34:41+5:302026-01-25T09:35:07+5:30
Rahul Gandhi And BJP : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेचा संबंध मतचोरीच्या आरोपांशी जोडला आहे.

Rahul Gandhi : "जिथे भाजपाला पराभव दिसतो, तिथे मतदारच सिस्टीममधून गायब केले जातात"; राहुल गांधींचा मोठा आरोप
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेचा संबंध मतचोरीच्या आरोपांशी जोडला आहे. याचसोबत त्यांनी या प्रक्रियेशी संबंधित काही कागदपत्रंही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. राहुल गांधींनी असा आरोप केला आहे की, जिथे जिथे SIR प्रक्रिया राबवली जात आहे, तिथे तिथे मतचोरी पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर, "जिथे भाजपाला आपला पराभव स्पष्ट दिसतो, तिथे मतदारच सिस्टीममधून गायब केले जातात."
राहुल गांधींनी 'X'वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, "जिथे जिथे SIR, तिथे तिथे मतचोरी. गुजरातमध्ये SIR च्या नावाखाली जे काही केलं जात आहे, ती कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया नसून ती एक सुनियोजित, संघटित आणि धोरणात्मक मतचोरी आहे. सर्वात धक्कादायक आणि धोकादायक बाब म्हणजे एकाच नावावरून हजारो आक्षेप नोंदवण्यात आले आहेत."
"निवडून विशिष्ट वर्गांची आणि काँग्रेस समर्थक बूथवरील मते कापली गेली आहेत. जिथे भाजपाला पराभव दिसतो, तिथे मतदारच सिस्टीममधून हटवले जातात. हाच पॅटर्न आळंद आणि राजुरामध्ये दिसला. आता तीच ब्लूप्रिंट गुजरात, राजस्थान आणि ज्या ज्या राज्यांमध्ये SIR लादण्यात आले आहे, तिथे राबवला जात आहे."
जहाँ-जहाँ SIR, वहाँ-वहाँ वोट चोरी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 24, 2026
गुजरात में SIR के नाम पर जो कुछ किया जा रहा है, वह किसी भी तरह की प्रशासनिक प्रक्रिया नहीं है - यह सुनियोजित, संगठित और रणनीतिक वोट चोरी है।
सबसे चौंकाने वाली और ख़तरनाक बात यह है कि एक ही नाम से हज़ारों-हज़ार आपत्तियाँ दर्ज की गईं।
चुन-चुनकर… https://t.co/LC9i5DP44y
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर कडक शब्दांत टीका करताना म्हटलं की, "SIR प्रक्रियेला 'एक व्यक्ती, एक मत' या घटनात्मक अधिकाराचा बळी देणाऱ्या शस्त्रात रूपांतरित करण्यात आलं आहे, जेणेकरून जनता नाही तर भाजपा ठरवेल की सत्तेत कोण राहणार. सर्वात गंभीर सत्य हे आहे की, निवडणूक आयोग आता लोकशाहीचा रक्षक उरला नसून या मतचोरीच्या कटातील मुख्य सहभागी बनला आहे."
गुजरात काँग्रेसने 'X' वर जिल्ह्यानुसार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. काँग्रेसचा असा आरोप आहे की, राहुल गांधींनी मतचोरीचा पर्दाफाश केल्यानंतर भाजपाने आता 'निवडणूक चोरी'चे पुढच्या पातळीवरील मॉडेल अवलंबलं आहे. निवडणूक चोरी म्हणजे तुमच्या मतदानाच्या अधिकाराची चोरी. याचा नवा खेळ गुजरातमध्ये समोर आला आहे. नियमानुसार, निवडणूक आयोगाने SIR नंतर मसुदा यादी प्रसिद्ध करून आक्षेप घेण्यास सुरुवात केली आणि १८ जानेवारी ही अंतिम तारीख जाहीर केली. १५ जानेवारीपर्यंत मोजकेच आक्षेप आले होते, पण खरा खेळ त्यानंतर सुरू झाला. एका कटांतर्गत अचानक लाखो आक्षेप (फॉर्म ७) जमा करण्यात आले.