मुंबईपासून १०० सागरी मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय तेल तस्करीच रॅकेट कोस्टगार्डकडून ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 07:01 IST2026-02-08T07:00:57+5:302026-02-08T07:01:29+5:30
तटरक्षक दलाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पाळत ठेवली असता भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात संशयास्पद हालचाली करणारे एक जहाज आढळल्याने त्याचा माग काढण्यात आला.

मुंबईपासून १०० सागरी मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय तेल तस्करीच रॅकेट कोस्टगार्डकडून ध्वस्त
नवी दिल्ली - मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे १०० सागरी मैल अंतरावर समुद्रात केलेल्या कारवाईत तीन जहाजे जप्त करून आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने (कोस्टगार्ड) शनिवारी दिली. या तीनही जहाजांवर तटरक्षक दलाने पाळत ठेवली होती. ५ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या पश्चिमेला १०० सागरी मैल अंतरावर तटरक्षकाने तीन जहाजांना अडविले. या जहाजांच्या कागदपत्रांची तपासणी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर तेलतस्करीचा हा मामला उघडकीस आला. या जहाजांचे मालक अन्य देशांत स्थायिक आहेत.
नफा कमवण्याचा उद्देश
तटरक्षक दलाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पाळत ठेवली असता भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात संशयास्पद हालचाली करणारे एक जहाज आढळल्याने त्याचा माग काढण्यात आला. त्या जहाजानजिक आणखी दोन जहाजे आल्याचे आढळून आले. ही जहाजे समुद्रात तेल व तेलजन्य अन्य उत्पादनांचे दुसऱ्या जहाजात बेकायदा पद्धतीने हस्तांतरण करत होती. कर बुडविण्याचा या तस्करांचा डाव होता. ही तीन जहाजे मुंबई बंदरात आणली जाणार असून तपास सुरू आहे.