मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक महामंडळाचे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारण्यासाठी भाजप नेते सौभाग्य सिंह ठाकूर यांनी सोमवारी उज्जैन ते भोपाळ असा प्रवास केला. मात्र, फक्त त्यांच्या नियुक्ती सोहळ्यानेच नव्हे, तर त्यांच्यासोबत असलेल्या गाड्यांच्या अवाढव्य ताफ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
उज्जैन ते भोपाळ दरम्यान फुलांच्या माळांनी सजवलेल्या एसयूव्ही गाड्यांची रांग जाणे ही नवीन गोष्ट नाही. पण मध्य प्रदेशातील या ताफ्याची वेळ अत्यंत 'विरोधाभासी' ठरली आहे.
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी इंधन वापरात कपात करण्याचे आवाहन केल्यानंतर अवघ्या एका दिवसात, मध्य प्रदेशातील हा भाजप नेता तब्बल ५० गाड्यांच्या ताफ्यासह फिरताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सौभाग्य सिंह ठाकूर यांनी आपला नवीन पदभार स्वीकारण्यासाठी उज्जैनहून भोपाळला जाताना समर्थक आणि एसयूव्ही गाड्यांचा मोठा लवाजमा सोबत घेतला होता. महामार्गावरील या ताफ्याचे व्हिडीओ समोर आला असून, समर्थकांनी अनेक ठिकाणी ठाकूर यांचे स्वागत करण्यासाठी गाड्या थांबवल्या होत्या. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पंतप्रधानांच्या आवाहनाला केराची टोपली?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संकट आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेता पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे जाहीर आवाहन केले होते. रविवारी तेलंगणातील एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी नागरिकांना अनावश्यक इंधन वापर टाळण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे तसेच इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधान म्हणाले होते की, "कोविड काळात आपण वर्क-फ्रॉम-होम आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या पद्धती अवलंबल्या होत्या, त्या पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे." त्यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि सोन्याची खरेदी टाळण्याचा सल्लाही दिला होता.
मात्र, पंतप्रधानांनी दिलेला इंधन बचतीचा सल्ला त्यांच्याच पक्षातील नेते पाळत आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'एक्स' वर पोस्ट करत म्हटले की, "काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्याचे आवाहन केले... हे केवळ सल्ले नसून ते प्रशासनाच्या अपयशाचा पुरावा आहेत." त्यांनी सरकारवर आपली जबाबदारी नागरिकांवर ढकलल्याचा आरोप केला.
भाजपनेही यावर प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, "भारत आपल्या ऊर्जेच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करतो. जागतिक आर्थिक धक्क्यांपासून देशाला वाचवण्यासाठी हे आवाहन करण्यात आले होते. पंतप्रधानांनी जे सांगितले ते सरकारचे कर्तव्य होते.
Web Summary : A BJP leader in Madhya Pradesh, immediately after PM Modi's fuel conservation appeal, traveled from Ujjain to Bhopal with a 50-car motorcade to assume his new post, sparking criticism and political debate.
Web Summary : मध्य प्रदेश में एक भाजपा नेता ने पीएम मोदी की ईंधन संरक्षण अपील के तुरंत बाद, अपना पदभार संभालने के लिए 50 कारों के काफिले के साथ उज्जैन से भोपाल की यात्रा की, जिससे आलोचना और राजनीतिक बहस छिड़ गई।