फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:35 IST2025-12-24T12:34:28+5:302025-12-24T12:35:29+5:30
अकरावीत शिकणाऱ्या अहानाला जंक फूड खाण्याची आवड होती आणि त्यामुळेच तिच्या आतड्यांना इन्फेक्शन होऊन तिचा मृत्यू झाला.

फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका विद्यार्थिनीचा दिल्लीच्या 'एम्स' रुग्णालयात मृत्यू झाला. अकरावीत शिकणाऱ्या अहानाला जंक फूड खाण्याची आवड होती आणि त्यामुळेच तिच्या आतड्यांना इन्फेक्शन होऊन तिचा मृत्यू झाला, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच दरम्यान अहानाचा मृत्यू खरोखरच फास्ट फूड खाल्ल्यामुळे झाला का? यावर डॉक्टर काय म्हणतात? हे जाणून घेऊया...
दिल्ली एम्सशी संबंधित अधिकृत सूत्रांनी 'एनडीटीव्ही'ला सांगितलं की, १९ डिसेंबर रोजी या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर सुनील चुंबर यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू होते. अहानाला जेव्हा एम्समध्ये आणलं गेलं, तेव्हा तिला आधीच टायफाइड झाला होता. हा टायफॉइड इतका गंभीर होता की, त्यामुळे तिच्या आतड्यांना छिद्र पडलं होतं. जोपर्यंत टायफाइड नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत सर्जरी करणं शक्य नव्हतं.
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
विद्यार्थिनीचा मृत्यू नेमका कसा झाला?
या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी मृत विद्यार्थिनीचे नातेवाईक साजिद खान यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, "एम्सच्या डॉक्टरांनी अहानाचा मृत्यू 'कार्डियक अरेस्ट'मुळे झाल्याचं सांगितलं आहे. एम्समध्ये तिच्यावर अतिशय उत्तम उपचार झाले आणि ती बरीही होत होती, परंतु अचानक तिचा मृत्यू झाला. आम्ही डॉक्टरांनी केलेल्या उपचारांवर पूर्णपणे समाधानी आहोत."
कुटुंबीयांचा जंक फूडवर संशय
साजिद खान यांनी पुढे सांगितलं की, "अहानाला लहानपणापासूनच फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड खाण्याची सवय होती. तिला आधीपासूनच काही शारीरिक समस्या होत्या. अलीकडे तिच्या आतड्यांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या. आम्हाला खात्री आहे की, फास्ट फूडमुळेच तिच्या आतड्यांना ही इजा झाली. पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र पडलं. आम्ही मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर सर्जरी केली होती." या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.