दिल्लीतील ८७ फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 09:22 PM2019-10-14T21:22:02+5:302019-10-14T21:22:08+5:30

गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते.

87 fireworks vendor licenses canceled | दिल्लीतील ८७ फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द

दिल्लीतील ८७ फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द

Next

नवी दिल्ली : गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते. मात्र, यंदा संपूर्ण दिल्लीतून केवळ ११ व्यापा-यांना फटाके विक्रीसाठी परवाने देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाने ९८ पैकी ८७ अर्ज बाद करताना केवळ ११ व्यापा-यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. सर्वोच्च न्यायालयाने हरित फटाके वापरण्याचे आदेश देताना व्यापा-यांना परवाना देण्यावर काही निर्बंध घातले होते. त्याचप्रमाणे परवाना देताना सर्व बाबी तपासण्यासही सांगण्यात आले होते.

परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी २७ ते ३० सप्टेंबरचा कालावधी निश्चित केला होता. संपूर्ण दिल्लीतून केवळ ९८ व्यापा-यांनी परवान्यासाठी अर्ज केले होते. नियमांची अंमलबजावणी न केल्याने अग्निशमन विभागाने ८७ अर्ज बाद केले. ११ व्यापा-यांना अस्थायी परवाने देण्यात आले आहेत. पक्के दुकान असणारे व्यापारी २४ दिवस आणि तात्पुरते दुकान असणारे व्यापारी १५ दिवस हरित फटाक्यांची विक्री करू शकणार आहेत. परवान्याचे अर्ज बाद केल्यामुळे व्यापा-यांमध्ये नाराजी आहे.

प्रदूषणात होणा-या वाढीमुळे पोलीस फटाके विक्री व्यापा-यांवर लक्ष ठेवून असणार आहेत. दिल्लीत दिवाळीत रात्री केवळ दोन तास फटाके वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी फटाके वाजवण्यासाठी २५०० ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. यंदा परवाना विभागाने दिल्ली महापालिका, दिल्ली  कॅन्टोन्मेंट या संस्थांना पत्र लिहून फटाके वाजवण्यासाठी जागा वाढवण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. प्रदूषण पसरवणारे फटाके उडवणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी ६० लोकांना प्रदूषण पसरवणारे फटाके विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.  
फटाके उडवण्याबाबत जनजागृती
प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी स्थानिक नागरिकांमध्ये फटाके उडवण्याबाबत जनजागृती करणार आहेत. लोकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच हरित फटाके उडवावेत यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. पत्रके वाटून हरित फटाके उडवण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. सामान्य फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात विषारी वायू बाहेर पडतो. मात्र, हरित फटाके उडवल्यानंतर बाहेर पडणा-या विषारी वायूचे प्रमाण कमी असते.

Web Title: 87 fireworks vendor licenses canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.