45 policemen suspended for taking bribe in Bihar | लाच घेतल्याप्रकरणी 45 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

लाच घेतल्याप्रकरणी 45 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

पटना : बिहारची राजधानी पटनामध्ये लाच घेतल्याच्या आरोपाखाली 45 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येथील महात्मा गांधी सेतूवरून अवजड वाहनांना जाण्यासाठी कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांनी लाच घेतल्याचे प्रकरण आहे.

बिहारमध्ये पहिल्यांदाच लाच घेतल्याच्या आरोपाखाली इतक्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमरकेश डी यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, छठ पूजा सुरू असताना महात्मा गांधी सेतूवर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, अवजड वाहन चालकांकडून पैसे घेऊन त्यांना जाण्यास परवानगी दिली. सोबतच वाहन चालकांकडून घेण्यात आलेली ही लाच वाटून घेण्यावरून पोलिसांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा पोलीस निरीक्षक, सात विशेष उपनिरीक्षक आणि 32 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक अमरकेश डी यांनी कारवाई केल्यानंतर सांगितले की, सीसीटीव्हीद्वारे चौकशी केली असता लाच घेतल्याचे दिसून आले. त्याआधारे प्राथमिक गुन्हा दाखल करण्याचे आणि जे पोलीस अधिकारी या प्रकरणात सामील आहेत, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या महात्मा गांधी सेतूवर सर्व नवीन पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

पोलीस विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, महात्मा गांधी सेतूवरून अवजड वाहनांना पार करताना लाखो रुपयांची कमाई होत होती. ती पोलीस आपापसात वाटून घेत होते. त्यामुळे या महात्मा गांधी सेतूवर वाहतूक कोंडी होत होती. मात्र, आता या कारवाईनंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असे सांगण्यात येते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 45 policemen suspended for taking bribe in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.