टेंभ्यात अवतरली शिवशाही

By Admin | Updated: July 29, 2014 00:53 IST2014-07-28T23:51:41+5:302014-07-29T00:53:27+5:30

अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण : गावकऱ्यांनी दारी उभारल्या गुढ्या

Shiva Shahi, in the form of a descendant | टेंभ्यात अवतरली शिवशाही

टेंभ्यात अवतरली शिवशाही

नामपूर : दिवाळी-दसऱ्यासारखे गावातील प्रत्येक दारासमोर सडा, रांगोळ्या...दाराला तोरणे, घरावर भगव्या गुढ्या...तुताऱ्यांचा निनाद...ढोल-ताशांचा गजर अन् सोबतीला ध्वनीक्षेपकावरून शिवरायांच्या पराक्रमाचे गुणगान गाणारे पोवाडे यामुळे आख्या खालच्या टेंभ्यात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता...निमित्त होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचे!
सरंपच भाऊसाहेब अहिरे यांच्या संकल्पनेतून आणि पदराच्या ४३ लाख रुपयांच्या खर्चातून साकारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बडोद्याचे माजी खासदार सत्यजितराजे गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापराव सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार उमाजी बोरसे, दादा भुसे, माजी आमदार डॉ. दौलतराव अहेर, दिलीप मंगळू बोरसे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी अहेर व विक्रीकर आयुक्त अविनाश भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पेशवाई ग्रुपचे मावळे, घोड्यावर स्वार जिजाऊ मातेच्या वेशातील कलावंत अग्रभागी घेऊन प्रमुख पाहुण्यांची ढोल-ताशे व तुताऱ्यांच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद येथील शिवशाहीर सुरेश जाधव यांनी शिवचरित्रावर पोवाडा सादर केला. टेंभ्यात साकारलेला शिवरायांचा भव्य पुतळा गावातील तरुणपिढीला सतत प्रेरणा देत राहील, असे गायकवाड यांनी सांगितले. खासदार भामरे यांनी गाव परिसरात झालेल्या गावकऱ्यांच्या सहभागातून झालेल्या छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांमुळे गावाचा पाणीप्रश्न सुटला असून, गावाने जंगलाचे संगोपन केल्यामुळे हे गाव राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली. त्यात मांजरपाडा १ व २ या प्रकल्पाबाबत चर्चा तसेच बागलाण, कळवण, देवळा व मालेगाव हे तालुके दुष्काळी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
या कार्यक्रमात भाऊसाहेब अहिरे यांचा गावकऱ्यांच्या हस्ते, तर प्रमुख अतिथींच्या हस्ते पुतळा तयार करणाऱ्या किशोर महाजन यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Shiva Shahi, in the form of a descendant