शिवसेना, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत

By Admin | Updated: January 10, 2017 00:37 IST2017-01-10T00:37:22+5:302017-01-10T00:37:33+5:30

चढाओढ : आरक्षणामुळे बहुरंगी लढती होण्याची चिन्हे

Shiv Sena, NCP fight for prestige | शिवसेना, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत

शिवसेना, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत

भगवान गायकवाड  दिंडोरी
तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखला जाणारा गट म्हणजे खेडगाव. गटातील सदस्य कोणत्याही प्रवर्गाचा होवो, मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेत पदाधिकारी पद मिळतेच, अशी परंपरा या गटाची आहे. हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असून, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती व माजी आमदार यांच्या दावेदारीने येथील लढत काट्याची होणार यात शंका नसून येथील गट-गणाच्या लढती शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या बनणार आहेत. गेल्यावेळी न लढलेले कॉँग्रेस, भाजपा, माकपा यंदा लढण्याच्या तयारीत असून, तसे झाले तर नेहमी सरळ होणारी लढत बहुरंगी होणार आहे.
खेडगाव गट हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत शिवसेनेने बाजी मारत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. खेडगाव गटाचे राजकारण हे राष्ट्रवादीचे नेते कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी चेअरमन अ‍ॅड. बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांच्या गट-तटात रंगलेले असून, गेल्या वेळी डोखळे व कावळे गटाने कादवाची सत्ता शेटे यांच्याकडे गेल्यावर एकत्र येत विधानसभा व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. खेडगाव गटात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विद्या पाटील यांचा शिवसेनेच्या शोभा डोखळे यांनी पराभव केला होता. शिवसेनेने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करण्यासाठी राष्ट्रवादीचे काही मोहरे आपल्या गळाला लावले होते. जयराम डोखळे यांना शिवसेनेत आणत त्यांच्या पत्नी छाया डोखळे यांना गणात उमेदवारी दिली, तर मातेरेवाडी गणात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून झालेली नाराजी अचूक कॅश करत दोन्ही गण जिंकण्याबरोबरच गटही अलगद जिंकत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला होता.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आली मात्र गेल्या अडीच वर्ष पदाधिकारी निवडीच्या सत्तेच्या सारिपाटात राष्ट्रवादी व शिवसेना-भाजपा यांची ऐनवेळी जिल्हा परिषदेत युती होत शोभा डोखळे यांना महिला व बालकल्याण सभापती होण्याचा मान मिळाला होता.

Web Title: Shiv Sena, NCP fight for prestige