येवल्यात युरिया खताची तीव्र टंचाई

By Admin | Updated: August 22, 2014 00:26 IST2014-08-21T22:15:28+5:302014-08-22T00:26:53+5:30

साठेबाजी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

The severe shortage of urea fertilizers in Yeola | येवल्यात युरिया खताची तीव्र टंचाई

येवल्यात युरिया खताची तीव्र टंचाई

जळगान नेऊर : येवला तालुक्यात विशेषत: जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या झालेल्या पूर्व भागात युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील वितरक, विक्रेते व ग्रामीण भागातील दुकानांमध्ये युरिया शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. भाववाढीच्या अफवेने व्यापाऱ्यांनी युरिया खताचा साठा दाबल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र या साठेबाजीवर कारवाई करण्यास शासनाचे अधिकारी हतबल असल्याचे दिसून येत आहे.
युरिया खताच्या टंचाईबाबत शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाकडे संपर्क साधल्यावर हा विभाग पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवित आहे, तर पंचायत समितीचे अधिकारी कृषी विभागाकडे बोट दाखवित आहे. या दोन विभागांच्या टोलवाटोलवीत मात्र शेतकऱ्यांचे मरण होत आहे. येवला तालुक्यातील विक्रेत्यांकडे किती युरिया शिल्लक आहे. याची आकडेवारी देण्यास पंचायत समिती, कृषी अधिकारी धस यांनी असमर्थता दर्शविली, तर युरियासाठा आम्ही शोधून दिल्यास कारवाई करणार काय? या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धस यांनी कारवाई करणार नाही. पण साठा विक्री करण्यास दुकानदारास भाग पाडू, असे उत्तर दिले. यावरून शासनाचे अधिकारी विक्रेत्यांमुळे हतबल असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कृषी अधिकारी अशोक कुळधर व धस यांच्याशी संपर्क साधला असता, तीन दिवसांनंतर युरियाचे तीन रॅक उपलब्ध होणार असून, त्यानंतर सुरळीत विक्री व वाटप सुरू होईल, अशी दोघांनीही माहिती दिली. तसेच शेतकरी गटांसाठीदेखील ५०० टन युरिया उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)

Web Title: The severe shortage of urea fertilizers in Yeola