सायखेड्यात कांद्याला ७०० रुपये भाव

By Admin | Updated: August 24, 2016 01:14 IST2016-08-24T01:13:57+5:302016-08-24T01:14:41+5:30

एका शेतकऱ्याला मात्र पाच रुपये क्विंटलचा भाव

In the sack, the price of onion 700 rupees | सायखेड्यात कांद्याला ७०० रुपये भाव

सायखेड्यात कांद्याला ७०० रुपये भाव

नाशिक : जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सध्या कांद्याला सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. काही शेतकरी पुरामुळे ओला होऊन अत्यंत खराब झालेला कांदाही बाजारात आणत असल्याने त्याचा भाव कमी पुकारला जात असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सायखेडा बाजारात सोमवार आणि मंगळवारी कांद्याला सरासरी ६०० ते जास्तीत जास्त ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला असल्याची माहिती कांदा व्यापारी सुरेश कमानकर यांनी दिली.
सोमवारी सायखेडा बाजारात एका शेतकऱ्याने पुराच्या पाण्यामुळे अत्यंत खराब झालेला कांदा आणि त्याच शेजारी थोडा बऱ्यापैकी पण तोही खराबच असा कांदा विक्रीसाठी आणला होता. जो कांदा बऱ्यापैकी होता त्याला क्विंटलला २५ रुपये भाव पुकारण्यात आला आणि जो कांदा अत्यंत खराब होता त्याचे वजन चांगल्या कांद्याबरोबर न करता तो पाच रुपये क्विंटलने देण्याचे शेतकऱ्यास सांगण्यात आले होते. कांद्याला कमी भाव मिळाल्याने संबंधित शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडे कांदा खाली केलाच नसल्याचे कमानकर यांनी सांगितले. एकदमच खराब असलेला कांदा घेऊनही व्यापाऱ्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याला तो माल फेकूनच द्यावा लागतो. यासाठी शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी कांदा माल बाजारात आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: In the sack, the price of onion 700 rupees