गॅसजोडणी तपासणी नावाखाली लूट

By Admin | Updated: January 20, 2017 23:20 IST2017-01-20T23:19:43+5:302017-01-20T23:20:01+5:30

शिवसेनेचा विरोध : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना ग्राहकांचे निवेदन

Robbery under the name of gas connection check | गॅसजोडणी तपासणी नावाखाली लूट

गॅसजोडणी तपासणी नावाखाली लूट

सिडको : एलपीजी गॅसजोडणीच्या तपासणीच्या नावाखाली भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या वितरकांमार्फत ग्राहकांची होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या वितरकांमार्फत गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस ग्राहकांना मोबाइलवर मॅसेज पाठवित आहे. भारत पेट्रोलियमच्या आदेशानुसार गॅसजोडणी तपासणी अनिवार्य आहे. लवकरच आमचा मेकॅनिक तपासणीसाठी येईल. त्याचे ओळखपत्र तपासून तपासणीकामी सहकार्य करून त्यांना तपासणीचे शुल्क देऊन पावती घ्यावी, अशा आशयाचे मॅसेज पाठवून प्रत्येक गॅसजोडणीमागे ग्राहकांची आर्थिक लूटमार करून जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवित आहे. शिवाय दुरुस्ती, स्पेअरपार्टच्या नावाखाली आणखी आर्थिक भुर्दंड देण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. आधीच नोटाबंदी, इंधन दरवाढ, दूध दर वाढीने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला लुटण्याचा हा नवीन प्रकार त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी प्रवीण तिदमे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुळात, अशा प्रकारची तपासणी करणे ही पुरवठादार कंपनीचीच जबाबदारी आहे. त्याचा भुर्दंड जनतेच्या माथी टाकणे योग्य नाही. सुरक्षेसाठी तपासणी अनिवार्य जरूर असावी. परंतु, त्याचा आर्थिक भार कंपनीने उचलावा, अशी मागणीही तिदमे यांनी केली आहे. निवेदनाप्रसंगी देण्यासाठी महेश ढोरे, श्रेयस घुले, हेमंत कोठारी, सुनील पवार, जुनेद खतीब आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Robbery under the name of gas connection check