येवल्यात कांद्याची विक्रमी आवक

By Admin | Updated: January 10, 2017 00:41 IST2017-01-10T00:41:02+5:302017-01-10T00:41:26+5:30

बाजारभावात घसरण : १९०० ट्रॅक्टरमधून ४६ हजार ७०० क्विंटल

Record arrival of onion in Yeola | येवल्यात कांद्याची विक्रमी आवक

येवल्यात कांद्याची विक्रमी आवक

येवला : येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर सोमवारी १९०० ट्रॅक्टरमधून ४६ हजार ७०० क्विंटल एवढी प्रचंड आवक झाली. येवला कांदा बाजार आवाराचा सर्व परिसरात कांदाच कांदा चोहीकडे असे चित्र दिसत होते.
मार्केटचा परिसर पूर्ण भरल्याने नगर - मनमाड रस्त्यावर दोन्ही बाजूंना ट्रॅक्टरच्या रांगाच रांगा लागल्याने दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास वाहतूक खोळंबली. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन तास अतिशय धीम्या गतीने वाहतूक चालू होती. येवला कांदा बाजार आवारात किमान ३०० ते ६५१ पर्यंत होते. आणि सरासरी भाव ६०० रुपये प्रतिक्विंटल होते.
अंदरसूल कांदा मार्केटवर हमाल व मापारी यांच्या प्रश्नावर सोमवारी मार्केट बंद राहते की काय, अशी स्थिती असताना मार्केट कमिटी प्रशासनाने शेतकऱ्याची सोय व्हावी म्हणून मार्केटचे लिलाव सुरू केले. शुक्रवारी असहकार करणारे माथाडी कामगार सोमवारी मार्केट सुरू झाल्यानंतर सुमारे तासभराने कामाला लागल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार यांनी दिली. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. १३ ते १५ जानेवारीदरम्यान कांदा बाजार आवार बंद राहणार असल्याने कांदा मार्केटला कांद्याचा महापूर आला आहे. याशिवाय पोळ कांदा व रांगडा कांदा दोन्हींचे विक्रमी उत्पादन तालुक्यात झाल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा मार्केटला येऊ लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परंतु कांद्याचा उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Record arrival of onion in Yeola