दुर्मिळ नाणी, ऐतिहासिक वस्तूंचा खजिना

By Admin | Updated: January 9, 2017 01:37 IST2017-01-09T01:37:17+5:302017-01-09T01:37:44+5:30

रेअर फेअर प्रदर्शनाचा समारोप : विस्मृतीत गेलेल्या वस्तूंचादेखील समावेश; नागरिकांचा प्रतिसाद

Rare Coins, Treasures of Historical Items | दुर्मिळ नाणी, ऐतिहासिक वस्तूंचा खजिना

दुर्मिळ नाणी, ऐतिहासिक वस्तूंचा खजिना

नाशिक : विविधरंगी आणि विविध आकारातील नोटा, अनेकविध नाणी, दुर्मिळ तसेच परदेशी चलन, पोस्टाची तिकिटे यासह ऐतिहासिक वस्तू, वेगवेगळे रत्न आणि विस्मृतीत गेलेल्या वस्तूंचे अनोखे ‘रेअर फेअर २०१७’ या प्रदर्शनाचा रविवारी समारोप करण्यात आला. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कलेक्टर्स सोसायटी आॅफ न्यूमिसमॅटिक अ‍ॅण्ड रेअर आयटम्स नाशिक यांच्यातर्फे जुना गंगापूर नाका येथील चोपडा लॉन्स येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ चलनांबरोबरच फिलाटेलीक पोस्टाची तिकिटे, मिनिएचर पेंटिंग, स्वातंत्र्यकाळानंतरची प्रसिद्ध केलेली विशेष नाणी, ठरावीक सण, उत्सव तसेच नेत्यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करण्यात येणारी नाणी, शिवराई, तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची विदेशी नाणी आणि नोटा, आकर्षक नंबरच्या सीरिजची नाणी या ठिकाणी मांडण्यात आली आहे.
रेअर फेअर प्रदर्शनात ‘शिवराई’ या शिवकालीन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन बघण्यासाठीदेखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिवराई या दुर्मिळ नाणेसंग्रहात शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांच्या काळातील असंख्य नाणी बघायला मिळतात. शिवाजी महाराजांनी रायगड येथे छापलेला एक पैसा, अर्धा पैसा आणि पाव पैसा तसेच उर्दू नाण्यांवर मोहोर उमटवलेल्या शिवराई येथे ठेवण्यात आल्या आहेत.
चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, इतिहास अभ्यासक मंजिरी भालेराव, बिंदू महाराज, सुशीलकुमार अग्रवाल, जयंत हुन्नरगीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. इतिहास अभ्यासक मंजिरी भालेराव यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाला शुभेच्छा देताना नाशिकची युवापिढी या प्रकारचा संग्रह करतेय ही चांगली बाब असल्याचे सांगितले. नाशिक शहराकडे वारसा स्थळ म्हणून बघितले जात असताना नाण्यांबरोबर इतरही वारसा जपायला हवा, असे आवाहन केले. यावेळी गिरीश शर्मा (इंदोर), जयंत हुन्नरगीकर (नाशिक) यांना उत्कृष्ट संग्रहाबद्दल ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Rare Coins, Treasures of Historical Items