शाही मार्गाचे अंशत: रुंदीकरण होणार

By Admin | Updated: July 29, 2014 00:52 IST2014-07-28T22:51:59+5:302014-07-29T00:52:09+5:30

शाही मार्गाचे अंशत: रुंदीकरण होणार

The partial widening of Shahi Marg will be done | शाही मार्गाचे अंशत: रुंदीकरण होणार

शाही मार्गाचे अंशत: रुंदीकरण होणार

 नाशिक : शाही मार्गाच्या रुंदीकरणास होणारा विरोध आणि प्रत्यक्ष जागेवर असलेली स्थिती याचा विचार करता पालिकेला मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करता शाही मार्गाचे अंशत: भागातच रुंदीकरण केले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात येत्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी साधू-महंतांनी काढलेल्या मिरवणुकीत पंचवटीतील सरदार चौकात भाविकांची चेंगराचेंगरी झाली. त्यात २९ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियुक्त करण्यात आलेल्या रमणी आयोगाने साधू-महंतांच्या शाही मार्गाच्या रुंदीकरणाची शिफारस केली होती. मुळातच विकास आराखड्यात दर्शविल्यानुसार हा मार्ग रुंद करण्यात आला नव्हता. त्याचा फटका भाविकांना बसला. त्यानंतर गेली अनेक वर्षे हा विषय रखडला होता. आता काही महिन्यांपूर्वी पालिकेने रुंदीकरणाची तयारी केली. त्यासाठी भूसंपादन विभागाला कळविण्यात आले. त्याच्या नोटिसा बजावल्यानंतर मोजमाप घेण्यात आले आणि त्यानंतर गेल्या १० जुलै रोजी महापालिकेच्या स्थायी समितीवर हा विषय मांडण्यात आला होता. भूसंपादनासाठी पन्नास टक्के रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव होता. परंतु त्यावेळी समितीचे सभापती राहुल ढिकले यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनच याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार राहुल ढिकले आणि आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी वेगवेगळ्या वेळी पाहणी केली. आता येत्या गुरुवारी (दि.३१) हा विषय समितीच्या बैठकीत मांडला जाणार असून, त्यात निर्णय घेतला जाणार आहे.
कुंभमेळ्यासाठी रुंदीकरण आवश्यक असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रुंदीकरण करणे व्यवहार्य नाही. विशेषत: मिरवणुकीच्या परतीच्या मार्गावर अनेक ठिकाणी जुने वाडे असून, रुंदीकरणात ते मागे सरकविणे अशक्य आहे किंबहुना हे वाडे पडण्याची शक्यता अधिक असल्याने साधू-महंतांना परतीचा मार्ग बदलून देण्याची शक्यता आहे. स्नानानंतर साधू-महंतांना मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी सार्वजनिक वाचनालय किंवा कपालेश्वराजवळील जागेतून थेट शनि मंदिरकडून परत तपोवनाकडे जाता येईल, असे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The partial widening of Shahi Marg will be done