महिलेच्या एकाकीपणाचा फायदा; 'होणाऱ्या पती'नेच लावला साडेचार लाखांचा चुना; १४ तोळे दागिनेही हडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 21:25 IST2026-05-10T21:24:57+5:302026-05-10T21:25:30+5:30
नाशिकमध्ये घटस्फोटित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

महिलेच्या एकाकीपणाचा फायदा; 'होणाऱ्या पती'नेच लावला साडेचार लाखांचा चुना; १४ तोळे दागिनेही हडपले
Nashik Crime: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, महिलांवरील अत्याचाराची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका चाळीस वर्षीय नराधमाने घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. यासोबत आरोपीने १४ तोळे सोन्याचे दागिने आणि साडेचार लाखांहून अधिक रुपयांची रोकड लुटली. स्वतःला कॅन्सर झाल्याचे खोटे सांगून भावनिक साद घालत त्याने ही लूट केली असून, याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियातून मैत्री आणि नंतर...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर २०२० मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख तौफिक वसियोद्दीन सय्यद (४०) याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झाले. पीडितेच्या एकाकीपणाचा फायदा घेत तौफिकने तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने वेळोवेळी महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
कॅन्सरचे खोटे नाटक आणि आर्थिक लूट
तौफिक इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेकडून पैसे उकळण्यासाठी अत्यंत धक्कादायक कृत्य केले. आपल्याला कॅन्सर झाला असून उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने पीडितेला सांगितले. आपल्या होणाऱ्या पतीच्या उपचारासाठी पीडितेने विश्वासाने पैसे दिले. आरोपीने विविध कारणांसाठी १ लाख ७५ हजार रुपये रोख घेतले. इतकेच नाही तर पैशांची नड असल्याचे सांगून त्याने पीडितेचे ५ तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवले. २०२३ मध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या बहाण्याने त्याने महिलेच्या गळ्यातील २ तोळ्यांची पोतही काढून घेतली. अशा प्रकारे एकूण १४ तोळे सोने आणि ४ लाख ६३ हजार ६०० रुपयांचा अपहार केला.
फसवणूक लक्षात येताच पोलिसात धाव
आरोपीचे लग्नाचे कोणतेही नियोजन नसून तो केवळ आपली आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक करत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तौफिक सय्यद याच्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.