Nashik's health crisis; Challenges of diseases with swine-flu, with rainy season | नाशिककरांचे आरोग्य संकटात; स्वाइन-फ्ल्यूसह पावसाळी साथरोगाचे आव्हान
नाशिककरांचे आरोग्य संकटात; स्वाइन-फ्ल्यूसह पावसाळी साथरोगाचे आव्हान

ठळक मुद्दे‘स्वाईन फ्ल्यू’ रूग्णसंख्या तब्बल १५० झाली. जिल्ह्यात तब्बल ३५ व्यक्ती या आजाराने दगावल्या.जानेवारीपासून ‘स्वाईन फ्ल्यू’चे रूग्ण आढळून येत आहेमागील वर्षी हिवाळ्यात केवळ एक रूग्ण

नाशिक : पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या ‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराची रूग्णसंख्या तब्बल १५० झाली आहे. शहरासह जिल्ह्यात वाढत्या ‘स्वाईन-फ्ल्यू’च्या प्रादुर्भावाबद्दल राज्यस्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वीच शहरात वैद्यकिय व्यावसायिकांच्या कार्यशाळा पार पडली. मागील वर्षी हिवाळ्यात केवळ एक रूग्ण आढळून आला होता; मात्र यावर्षी जानेवारीपासून ‘स्वाईन फ्ल्यू’चे रूग्ण आढळून येत आहे
शहरी भागासह जिल्ह्यातही स्वाईन-फ्ल्यू या आजाराने डोके वर काढले आहे. या सात महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३५ व्यक्ती या आजाराने दगावल्याने या आजाराची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसून येते. शासकिय स्तरावरून या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच प्रादूर्भाव टाळण्यासाठी ६५ हजार लसीची खरेदी राज्यभरात केली जाणार आहे. नाशिकमध्येही यामार्फत मोफत लसीकरण उपलब्ध होणार आहे; मात्र महापालिका आरोग्य विभागाने आलेली मरगळ झटकून शहरातील प्रभागांमध्ये डास निर्मूलन व स्वच्छतेविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेषत: शहरातील गावठाण भाग असलेल्या जुने नाशिक, वडाळागाव, पाथर्डी, द्वारका या परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. दाट लोकवस्तीमुळे या भागात नागरीकांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. मागील वर्षी जुलै महिन्यात वडाळागाव भागात थंडी, तापासह सांधेदुखीच्या आजाराने थैमान घातले होते. तब्बल शंभराहून अधिक रूग्ण यावेळी आढळून आले होते.

पावसाळी साथरोगाचे आव्हान
स्वाईन-फ्ल्यूचा फैलाव होत असताना दुसरीकडे पावसाळ्यामध्ये पसरणा-या साथरोगांचेही आव्हान महापालिकेपुढे निर्माण झाले आहे. यामध्ये हिवताप, डेंग्यू, चिक नगुण्या यांसारख्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी डासांची उत्त्पत्तीस्थळे नष्ट करण्यावर भर देणे गरजेचे आहे. वडाळागाव परिसरात डासांची उत्त्पत्ती मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर होत असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. तसेच भुमिगत गटारीही तुडूंब भरल्याने या भागात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पुन्हा पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थंडी, ताप, सर्दी, अंगदुखीच्या रूग्णसंख्या वडाळागावात मागील पंधरवड्यापासून वाढली असून प्रत्येक घरात एक रूग्ण थंडी-तापाचा आढळून येत आहे, असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही.

वेळीच ओळखावा धोका...
‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराची लक्षणांशी साम्य असलेली लक्षणे वडाळागावात बहुतांश रूग्णांमध्ये दिसत आहेत. घसा खवखवणे, थंडी वाजून ताप भरणे, अशक्तपणा , सर्दी, पडसे, अंगदुखी सारख्या शारिरिक तक्रारी वाढल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे वडाळागावा भागातील रूग्णांची थुंकीचे नमुने वगैऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. गावात स्वाईन फ्ल्यू सदृश्य रूग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Web Title: Nashik's health crisis; Challenges of diseases with swine-flu, with rainy season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.