आंदोलन : सीईओंच्या दणक्यानंतर बैठकीला हजेरी

By Admin | Updated: September 30, 2014 22:46 IST2014-09-30T22:46:31+5:302014-09-30T22:46:49+5:30

मारहाणीच्या निषेधार्थ वैद्यकीय संघटनेचे धरणे

Movement: After meeting the CEOs, attendance meets | आंदोलन : सीईओंच्या दणक्यानंतर बैठकीला हजेरी

आंदोलन : सीईओंच्या दणक्यानंतर बैठकीला हजेरी

नाशिक : मालेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला त्याच्या घरी जाऊन केंद्रातील एका शिपायाच्या मुलाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ३०) जिल्हा परिषदेच्या मासिक बैठकीवर काही वेळ राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला.
दरम्यान, या घटनेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना मिळताच त्यांनी घटना चार दिवसांपूर्वीची असून, या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांशी याबाबत बोललो आहोत. तरीही वैद्यकीय अधिकारी त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार असतील तर त्यांची एक दिवसाची विनावेतन करण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीतील बैठकीला हजेरी लावली.
सौंदाणे येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब खोत यांनी याच आरोग्य केंद्रातील परिचर पारखे नामक व्यक्तीला काही काम सांगितले. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर पारखे यांनी चिरंजीवाला घेऊन जाऊन डॉ. खोत यांना मारहाण केली. त्याच दिवशी सुखदेव बनकर यांनी डॉ. खोत यांच्याशी बोलून त्यांना पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक होती. त्यात ही बाब डॉ. खोत यांनी सांगताच राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ या बैठकीवर बहिष्कार टाकत मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या दिला. राज्य नर्सेस संघटनेच्या वतीने या मारहाणीच्या निषेधार्थ संघटनेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शोभा खैरनार यांनी दिली. त्यानंतर संघटनेचे शिष्टमंडळ आरोग्य उपसंचालकांना भेटून आले. यावेळी डॉ. प्रदीप जायभावे, डॉ. दिलीप सूर्यवंशी, डॉ. संजय पवार, डॉ. अरविंद माहुलकर आदि उपस्थित होते.

Web Title: Movement: After meeting the CEOs, attendance meets