शहरात पुन्हा वाढली अतिक्रमणे
नाशिक : शहराच्या विविध भागांत आणि चौकात अतिक्रमणे वाढत असून, त्यानंतरदेखील महापालिकेकडून फेरीवाला झोनची संख्या वाढवली जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील उपनगरांमध्ये अशाप्रकारे अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत. मात्र, मनपाकडून कोणत्याही प्रकारे नियोजन केले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
....
फेरीवाल्यांची बायाेमेट्रिक नोंदणी
नाशिक : केंद्र शासनाच्या फेरीवाला क्षेत्राअंतर्गत आता फेरीवाल्यांची संघटना मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा फेरीवाल्यांंचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी होऊ लागली आहे. महापालिकेने २०१३-१४ या वर्षात म्हणजे फेरीवाला क्षेत्राची अंमलबजावणी करण्याआधी नेांदणी केली हेाती. मात्र, त्यानंतर अशाप्रकारचे नोंदणीच केलेली नाही.
....
गोदावरीवरील पुलाचे बांधकाम सुरू
नाशिक : महापालिकेत विरोध झाल्यानंतरदेखील सत्तारूढ भाजपातील गटबाजीमुळे गंगापूररोडलगत गोदावरी नदीच्या काठावर चार पूल बांधण्यात येणा असून, त्यापैकी एका पुलाचे काम सुरू झाले आहे. कोणत्याही प्रकारची लोकवस्ती या भागात नसतानाही कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिका करीत आहे.
...
गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठीचे बोटिंग बंद
नाशिक : गोदावरी नदीतील कचरा काढणे आणि त्याचबरोबर अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्याचे काम करण्यासाठी सुरू असलेले बोटिंग सध्या बंद आहेत. होळकर पूल ते आनंदवलीच्या दरम्यान या स्वरूपाची कामे केली असत. मात्र, गोदावरी नदीच्या देखभालीचेदेखील खासगीकरण करण्यात आल्यानंतर प्रशासनाने अंग काढून घेतले आहे.
...
सिग्नलजवळच रस्ता खराब
नाशिक : त्र्यंबकरोडवर पंचवटी एलाइटजवळील सिग्नलच्या बाजूचा रस्ता खराब झाला असून, त्यामुळे तेथून पी अँड टी कॉलनीत वळताना अडचणी येत आहेत. सिग्नलवरील डाव्या बाजूचे वळण मोकळे ठेवले जात असताना साइड पट्ट्यांच्या ठिकाणी रस्ता उखडला गेल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.
....
झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी
नाशिक : लोकमत सर्कल ते पारिजातनगर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या कडेला असलेेलेल्या झाडांच्या फांद्या वाकून रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे पथदीप असतानाही उपयोग तर होत नाहीच, शिवाय कंटेनरसारखी मालवाहतूक करणारी झाडे जाताना झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडतात. मनपाने या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.