If Congress really gives opportunity to the youth, it will be a big challenge! | काँग्रेसने खरेच तरुणांना संधी दिल्यास चुरस वाढेल!
काँग्रेसने खरेच तरुणांना संधी दिल्यास चुरस वाढेल!

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा फॉर्म्युला पक्षातील मरगळ झटकणाराआता ‘बोले तैसा चाले’ची अपेक्षाप्रत्येकच वेळी तीच ती नावे व तेच ते चेहरे पुढे येतात. त्यामुळे काँग्रेसची वाढ गेल्या काही वर्षात खुंटल्यासारखी झाली आहे.

सारांश


ज्येष्ठता आणि त्याअनुषंगाने लाभलेला अनुभव हा कुठल्याही क्षेत्रात महत्त्वाचा व दिशादर्शकच ठरतो यात शंका नाही, मात्र जेव्हा दगड फोडून पाणी काढण्याची वेळ येते तेव्हा तरुणाईकडेच आशेने बघितले जाते. काँग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्षांनी पदभार स्वीकारताना यापुढे तरुणांना संधी देण्याची जी भूमिका जाहीर केली, ती म्हणूनच सद्य राजकीय स्थितीत त्या पक्षाला ‘अच्छे दिन’ आणून देऊ शकणारी व मरगळलेल्या मानसिकतेत लढण्याची ऊर्जा चेतवणारी म्हणता यावी.


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये ज्या उलथापालथी सुरू आहेत त्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला असून, पक्ष सोडून जाणाऱ्यांची चिंता करू नका; उलट येत्या विधानसभा निवडणुकीत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या तरुणाईच्या मुद्द्यावर उपस्थितांकडून जी दाद मिळाली ती पाहता, पक्षातील मंडळी नाउमेद न होता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा बाळगता यावी. पक्ष सोडून जाणाºयांना बॅण्डबाजा लावून सोडून या, असे म्हणत तरुणांवर व्यक्त केल्या गेलेल्या विश्वासामुळे सततच्या पराभवातून आलेली या पक्षातील मरगळ व निरुत्साह दूर होण्यास नक्कीच मदत होईल; पण प्रश्न आहे तो खरेच थोरात म्हणतात तसे तरुणांना संधी दिली जाईला का?


थोरात यांनी म्हटले त्याप्रमाणे, ते स्वत: पक्षांतर्गत गट-तट मानणार नाहीत, मात्र आजवर तसेच मानणाºयांकडून ते सोडले जाणेच मुळात मुश्कील आहे. दूर कशाला जायचे, नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण पुरेसे आहे. येथे नेते तेवढे गट व तट आहेत. एक अध्यक्ष बनला, की दुसºयाचा असहकार लगेच सुरू होतो. अगदी प्रतिकाँग्रेस चालविल्यासारखे जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रमही वेगवेगळे आयोजित करण्यापर्यंत गटबाजांची मजल जाते, पण आता तशी मस्ती चालणार नाही. काळ बदलला आहे, राजकारण कूस बदलत आहे. अशात स्वत:चेच अहम कुरवाळले जाणार असतील तर कुणालाच चांगले दिवस येणार नाहीत. नवे प्रदेशाध्यक्ष तरुणांना संधी देण्याचे म्हणत आहेत, मागे पक्षाच्या नाशिक शहराध्यक्षपदाची धुरा आकाश छाजेड या तरुणाकडे असताना ज्येष्ठांनी पुकारलेल्या असहकारामुळे त्यांना काम करणे किती जिकिरीचे ठरले होते हे अद्याप विस्मृतीत गेलेले नाही. तेव्हा, ज्येष्ठांनाही काळाची पावले ओळखत केवळ मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी लागेल, ते होईल का शक्य हा यातील मुद्दा आहे.


कोणतीही संधी आली, म्हणजे अगदी नगरसेवकत्वाच्या निवडणुकीपासून ते थेट आमदारकी-खासदाकीपर्यंत; प्रत्येकच वेळी तीच ती नावे व तेच ते चेहरे पुढे येतात. त्यामुळे काँग्रेसची वाढ गेल्या काही वर्षात खुंटल्यासारखी झाली आहे. आज पक्षात कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त झाले आहेत. तेव्हा कार्यकर्ते जोडून पक्ष वाढवायचा असेल तर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी बोलून दाखवलेला तरुणांना संधी देण्याचाच फॉर्म्युला उपयोगी पडणारा आहे. नाशिक जिल्ह्यात तशी सक्षमता असलेली काही नावे नक्कीच आहेत. मालेगावमध्ये आसिफ शेख आमदार म्हणून निवडून येऊन चांगले काम करीत आहेत. इगतपुरीत नयना गावित उत्तम पर्याय ठरू शकतात. जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तिकडे नांदगावमध्ये यंदा राष्ट्रवादीला अडचणीची स्थिती पाहता पुन्हा ती जागा काँग्रेसकडे घेतली गेल्यास माजी आमदार अनिल आहेर यांची कन्या आश्विनी आहेर तिथे संधीच्या प्रतीक्षेत आहेत. अश्विनी सध्या जि.प. सदस्य म्हणून प्रभावीपणे काम करताना दिसत आहे.


याहीखेरीज चांदवड-देवळ्यात शैलेश पवार उमेदवारीसाठी सक्षम पर्याय ठरू शकतात. डॉ. जे. डी. पवार यांच्या सक्रिय कार्याचा वारसा त्यांना आहेच, शिवाय जि. प. सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. येवल्यात रश्मी पालवे, देवळालीत राहुल दिवे, नाशिक पश्चिममध्ये पक्षाच्या युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष व खान्देश कनेक्शन असलेले स्वप्नील पाटील, मध्यमध्ये आकाश छाजेड आदी नावे यासंदर्भात घेतली जात आहेत. काँग्रेसच नव्हे, तर ज्या जागा राष्ट्रवादीला सोडल्या जातील तिथे त्या पक्षानेही तरुण व नव्या चेहºयांना संधी दिल्यास लढती चुरशीच्या ठरू शकतील. विश्वास न उरलेल्या नेत्यांपेक्षा नवी आव्हाने स्वीकारून आत्मविश्वासाने लढू शकणाºया तरुणांना संधी मिळणे त्यासाठी गरजेचे आहे.


Web Title: If Congress really gives opportunity to the youth, it will be a big challenge!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.