"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:50 IST2025-10-06T15:44:27+5:302025-10-06T15:50:10+5:30
Nashik Student Ends Life: इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेजमध्येच आयुष्य संपवले. त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

प्रातिनिधिक छायाचित्र
Nashik Student Crime News: 'आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळाली. आता तेच करणार आहे, जे माझ्या आयुष्यात होते", अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. नाशिकमध्ये ही घटना घडली. विद्यार्थ्याने कॉलेजमध्येच चौथ्या मजल्यावरून उडी मारली.
१७ वर्षीय विद्यार्थी पाथर्डी फाटा येथे आई-वडिलांसह राहत होता. त्याचे वडील खासगी कंपनीमध्ये कामाला असून, तो एकुलता एक मुलगा होता. बारावीच्या परीक्षेत त्याला ९५ टक्के गुण मिळाले होते. सध्या तो नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता.
कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय विद्यार्थ्याने ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता त्याच्या कॉलेजमध्ये चौथ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मी आता आयुष्याचा निरोप घेतोय; शेवटच्या पोस्टमध्ये काय?
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट लिहिली. त्याने म्हटले की, 'हाय, तुम्ही सर्व मला शेवटचं ऐकत आहात. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात ध्येय, स्वप्न शिल्लक राहिली नाहीत. माझ्यामुळे अनेकांना त्रास झालाय. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो. पण, माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळाली.'
'मी आता तेच करणार आहे, जे माझ्या आयुष्यात होते. सर्वांचे आभार. माझे कुटुंब, मित्र आणि माझे हितचिंतक सर्वांना खूप खूप प्रेम. सो सायनिंग ऑफ फ्रॉम लाईफ. (आयुष्याचा निरोप घेतोय.) गुड बाय. सर्वांचे आणि पालकांचे प्रयत्न मी वाया घालवले, त्याबद्दल खूप खूप माफी. तुम्ही काही चुकीचं केलं नाही. मी त्यासाठी पात्र नव्हतो...", असे म्हणत त्याने आत्महत्या केली.