हैदराबादचा संजय कैरा ‘मविप्र मॅरेथॉन’ विजेता

By Admin | Updated: January 9, 2017 01:21 IST2017-01-09T01:21:35+5:302017-01-09T01:21:49+5:30

महिला गटात अर्चना कोहकडे विजेती : महिलांच्या गटात अहमदनगरच्या स्पर्धकांचे वर्चस्व

Hyderabad's Sanjay Kara 'MVP Marathon' winner | हैदराबादचा संजय कैरा ‘मविप्र मॅरेथॉन’ विजेता

हैदराबादचा संजय कैरा ‘मविप्र मॅरेथॉन’ विजेता

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे चौथ्या राष्ट्रीय, नवव्या राज्यस्तरीय आणि १८व्या ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’चा किताब हैदराबाद येथील स्पर्धक संजय कैरा याने पटकावला. रविवारी (दि. ८) गंगापूररोड मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिटपटू अंजू बॉबी जॉर्ज यांच्या हस्ते करण्यात आले.
गोळकंडा हैदराबाद येथील संजय कैरा यांनी २:२७:२७ सेकंद या वेळेत निर्धारित ४२.१९५ किमीचे अंतर पूर्ण करून स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले. यावेळी संजय कैरा यांना अंजू बॉबी जॉर्ज यांच्या हस्ते एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी नाशिकसह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, सांगली, कराड, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, रत्नागिरी, अमरावती, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, कर्नाटक यांसह सेनादल आणि रेल्वेतील विविध स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
मविप्र मॅरेथॉन चौकापासून सुरुवात झालेल्या स्पर्धेचा जुना गंगापूर नाका, डॉ. विद्या विकास सर्कल, आनंदवली, सोमेश्वर, हॉटेल गंमत- जंमत, दुगाव फाटा, गिरणारे, धोंडेगाव, गंगापूर रोड मार्गे पुन्हा मॅरेथॉन चौक येथे समारोप करण्यात आला. मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी अंजू बॉबी जॉर्ज यांनी मॅरेथॉन हा सहनशीलतेचा खेळ असून यामध्ये मनावरचे नियंत्रण आणि शरीराचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अधिकाधिक युवा खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करण्याचेही आवाहन यावेळी केले.

Web Title: Hyderabad's Sanjay Kara 'MVP Marathon' winner