निधी कमी पडू देणार नाही

By Admin | Updated: December 27, 2014 01:34 IST2014-12-27T01:34:23+5:302014-12-27T01:34:41+5:30

मुख्यमंत्री फडणवीस : भाजपा कार्यकर्ता मेळावा

The funds will not fall short | निधी कमी पडू देणार नाही

निधी कमी पडू देणार नाही

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने राज्यातील शेतकरी संकटात आला आहे. मागील सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांत आठ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र शाश्वत शेतीसाठी अवघ्या एक हजार कोटींची तरतूद केली. भाजपा सरकारने मात्र पहिल्याच वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आठ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून, पाच वर्षांत शाश्वत शेतीसाठी ४० हजार कोटींच्या पॅकेजची तरतूद करण्यात येईल, तसेच नार-पार योजनेसह सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सिडकोतील पवननगर येथील जलकुंभ व नानासाहेब पाटील क्रीडा संकुलाचे उद््घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी विविध घोेषणांचा पाऊसच पाडला. देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्मार्टसीटीचा प्रयोग देशात सुरू झाला असून, त्याचीच कडी म्हणून आम्ही नाशिकला स्मार्ट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने दिला आहे. त्यांना सिंहस्थाची विशेष जबाबदारीही दिली आहे.
मागील काळात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फाईली हलत नव्हत्या, मात्र आपल्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात फाईली थांबत नाहीत. एका महिन्यात आपण २५ शहर विकास आराखडे मंजूर केले. मागील काळात हेच आराखडे पंधरा वर्षे उलटूनही मंजूर होत नव्हते. लवकरच पुढील काळात जनतेच्या सोयीसाठी सेवा अधिकार कायदा लागू करण्यात येणार असून, त्यामुळे जनतेची कामे वेळेत कमी होणार आहेत.
राज्य सरकारवर साडेतीन लाख कोटींचे कर्ज असून, एकूण महसुली तूट वर्षाकाठी २६ हजार कोटींच्या घरात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेच्या हिस्स्यापोटीची रक्कम राज्य सरकार उचलेल. तसेच नार-पार योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मेळाव्याच्या सुरुवातीलाच प्रास्ताविकात आमदार अपूर्व हिरे यांनी नार-पार योजना मार्गी लावण्याची मागणी केली.
या मेळाव्यास पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, माजीमंत्री डॉ. डी. एस. अहेर, कृषी सभापती केदा अहेर, संघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके, सुरेश पाटील, विकास देशमुख, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The funds will not fall short