नाशिक : महापालिकेची नवीन पंचवार्षिक काळातील तशी खऱ्या अर्थाने पहिलीच महासभा शनिवारी (दि.१५) झाली. महासभेत विरोधी पक्षांनी घेतलेला आक्रमक पवित्रा, भाजपातीलच सदस्यांकडून महापौरांना कोंडीत टाकण्याचा प्रयत्न यामुळे सत्ताधारी भाजपाची वाटचाल खडतर मानली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दत्तकविधानाची विरोधी सदस्यांनी टर उडविल्याने महापौरांचा पारा चढला आणि महासभेत वारंवार दत्तकविधानाचा उल्लेख झाल्यास आपल्या अधिकाराचा वापर करण्याचा दम त्यांना भरावा लागला.महापालिकेच्या महासभांचे कामकाज खऱ्या अर्थाने शनिवारी झालेल्या महासभेपासून सुरू झाले. या महासभेत काही प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. महासभेला सत्ताधारी व विरोधकांची बाके पूर्ण भरलेली होती. पहिल्याच महासभेचा कब्जा प्रामुख्याने ज्येष्ठ नगरसेवकांनीच घेतला. सभागृहात पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या सदस्यांची मोठी असल्याने सर्व जण महासभेचे कामकाज न्याहाळत होते. कुठे हास्यविनोद झाले तर दाद देत होते. महासभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत आपली वाटचाल दाखवून दिली. गजानन शेलार यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु महापौर रंजना भानसी यांनीही त्यांना शाब्दीक चिमटे काढत शेलारांची हवा काढून टाकली. याचवेळी राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दत्तक विधानाचा उल्लेख केला आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर किरण गामणे यांनी भाजपाचे नगरसेवक सिडकोत पाणीचोरी करतात हे आपल्याला अधिकाऱ्यांनीच सांगितल्याचा गौप्यस्फोट केला आणि मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचे कसे होणार, अशी चिंता व्यक्त केली. दत्तक विधानाची खिल्ली उडविली जात असल्याचे पाहून महापौरांचा पारा चढला आणि त्यांनी इतिवृत्तातून सदर शब्द काढून टाकण्याची सूचना नगरसचिवांना केली. शिवाय, सदस्यांनी सभागृहात बोलताना भान बाळगावे आणि कुणीतरी काहीही लिहून दिलेले नवख्या सदस्यांनी वाचून देऊ नये, असा सल्ला दिला. दत्तकविधानाचा व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख झाल्यास आपण सभागृहाचे असलेले अधिकारी वापरू शकतो, असा दमही महापौरांनी भरला. (प्रतिनिधी)
पहिली महासभा : विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा
By admin | Updated: April 16, 2017 01:03 IST
दत्तकविधानाची टर; महापौरांचा चढला पारा
पहिली महासभा : विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}