तात्पुरते स्थलांतर नको, संरक्षक भिंतच हवी

By Admin | Updated: August 3, 2014 01:57 IST2014-08-03T01:51:29+5:302014-08-03T01:57:45+5:30

तात्पुरते स्थलांतर नको, संरक्षक भिंतच हवी

Do not temporarily move, a protective wall | तात्पुरते स्थलांतर नको, संरक्षक भिंतच हवी

तात्पुरते स्थलांतर नको, संरक्षक भिंतच हवी

 

नाशिक : अनेक निवडणुका आल्या अन् गेल्या मात्र आम्ही व आमचे कुटुंब असुरक्षितच राहिले. काहींचा संसार मातीमोल झाला. शहराच्या विविध नेत्यांकडून काझी गढीला अनेकदा वळसाही घातला गेला; मात्र अद्याप महापालिका प्रशासनाला गढीला संरक्षक भिंत बांधण्याला मुहूर्त मिळत नाही हे दुर्दैव असून, संरक्षक भिंत हेच आमचे स्वप्न आहे, अशा भावना गढीच्या रहिवासी महिलांनी बोलून दाखविल्या.
‘आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या गढीवर वास्तव्यास असून, आमचे बालपणदेखील येथेच गेले व आमची मुलेही गढीवरच लहानाची मोठी झाली’, ‘आम्ही आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असून, उतारवयात कोठे जायचं’ असा प्रश्न उपस्थित करत गढीच्या रहिवाशांनी स्थलांतरास तीव्र विरोध दर्शविला असून जोपर्यंत लेखी स्वरूपात महापालिकेकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत स्थलांतर करणार नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे असून तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी निवारा हवा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दरवर्षी येथील रहिवाशांना घरपट्ट्या दिल्या जातात. यंदा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच मनपाच्या कर्मचाऱ्यांनी घरपट्ट्या आणून दिल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत गढी पूर्णपणे संरक्षक भिंतीने सुरक्षित केली जात नाही तोपर्यंत घरपट्टीची रक्कम भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे.
केवळ पावसाळ्यात जीवितहानीचा धोका दाखवून नोटिसा बजावण्यापलीकडे कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचा आरोप चंद्रकला नागपुरे, रंजना काथवटे, संगीता निरभवणे, सोन्याबाई खैरनार, बेबी खैरनार, कमल पगारे आदि महिलांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Do not temporarily move, a protective wall