पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’स्टाइल आंदोलन

By Admin | Updated: September 16, 2014 00:30 IST2014-09-15T00:41:51+5:302014-09-16T00:30:22+5:30

पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’स्टाइल आंदोलन

The corporation's' Sholay'style movement for water | पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’स्टाइल आंदोलन

पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’स्टाइल आंदोलन

 

पंचवटी : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक गणेश चव्हाण यांनी प्रभागातील नागरिकांसह प्रभातनगर येथील मनपा जलकुंभावर चढून अनोखे आंदोलन केले.
नगरसेवक चव्हाण यांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन सुरू केल्याचे समजताच मनपाच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून येत्या दोन ते तीन दिवसांत परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याबाबत सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
म्हसरूळ शिवारातील प्रभातनगर या भागातील नागरिकांसाठी मनपाने ३० वर्षांपूर्वी जलकुंभ उभारलेला आहे. सध्या या जलकुंभातून म्हसरूळ तसेच म्हसरूळ गावठाण, मखमलाबाद परिसर, कलानगर, दिंडोरीरोड, दत्तनगर, जुईनगर आदि भागांत पाणीपुरवठा केला जातो. सध्या पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. गंगापूर धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्यानंतर प्रशासनाने दोन वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. तरीही या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. त्यातच पाणीपुरवठा व वितरण विभाग यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून परिसरातील नागरिकांसह हे आंदोलन छेडण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: The corporation's' Sholay'style movement for water