सलग पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

By Admin | Updated: December 28, 2014 00:42 IST2014-12-28T00:41:51+5:302014-12-28T00:42:25+5:30

सोमवारी आंदोलनकर्ते तुरुंगात? ठिय्या देण्यावर मात्र आंदोेलकर्ते ठाम

Continuous movement for the fifth consecutive day | सलग पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

सलग पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

नाशिक : रोजंदारी व कंत्राटी स्वरूपातील कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेण्याच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालयाच्या आवारात सुरू असलेले आदिवासी विकास रोजंदारी शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक कर्मचारी संघटनेचे ठिय्या आंदोलन काल (दि.२७) शनिवारी पाचव्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आल्यावर आंदोलनकर्त्यांच्या वतीने तीन जणांच्या शिष्टमंडळाला घेऊन आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पोलीस परेड मैदान गाठले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी एक पत्र देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ३० डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे सूचित केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री आंदोलनकर्ते व आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्याच चर्चा झाली. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने चर्चा निष्फळ ठरली. त्यावेळी आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन असेच सुरू ठेवल्यास शासन दरबारी काहीही भूमिका घेण्यास नकार दिल्याचे समजते. तसेच आंदोलनकर्त्यांची संघटना कायदेशीर नाही, या कारणास्तव सोमवारी गरज पडल्यास आंदोलनकर्त्यांना पोलिसांच्या हवाली करण्याबाबतही गर्भित इशारा दिल्याचे कळते. शनिवारी दिवसभर आंदोेलनकर्ते आदिवासी विकास आयुक्तालयाच्या आवारात ठिय्या मांडून होते. (प्रतिनिधी)

Web Title: Continuous movement for the fifth consecutive day